उद्धव ठाकरे सरकारची उद्या बहुमत चाचणी, हंगामी विधानसभाध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील

0
99
छायाचित्र: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय.

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार उद्या शनिवारी बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. बहुमतासाठी लागणारा 145 संख्याबळाचा आकडा महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सहजपणे या अग्निपरीक्षेला सामोरे जाईल, असे म्हटले जात आहे. बहुमत चाचणीला सामोरे जाण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी ( प्रोटेम स्पिकर) राष्ट्रवादी काँग्रेचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची आजच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोनच दिवसांपूर्वी राज्यपालांनी भाजपचे कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यांनी नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. गुरूवारी  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मात्र हंगामी विधानसभा अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.अखेर राज्यपालांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांची हंगामी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली.

महाराष्ट्र विकास आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा मान्य केल्यानंतर राज्यपालांनी सरकारला 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे सरकार बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. आमच्या सरकारकडे 162 आमदारांचे संख्याबळ असून आम्ही बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत, असे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा