कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसह सर्वच पदवीच्या विद्यार्थ्यांना आता इंटर्नशिप बंधनकारक!

0
368
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः नव्या शैक्षणिक धोरणानुसार सर्वच विद्या शाखांतील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप म्हणजेच प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच या पुढे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करणे सक्तीचे असणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने ( यूजीसी) याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

सध्या व्यावसायिक विद्या शाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाच इंटर्नशिप करणे बंधनकारक आहे. मात्र नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता पारंपरिक विद्या शाखांसह सर्वच विद्या शाखांतील  पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप बंधनकारक करणारी तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण मंडळ, कौशल्य विकास केंद्र आणि सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या सहकार्याने विद्यार्थांना इंटर्नशिपच्या संधी देता येतील, असे यूजीसीने म्हटले आहे.

हेही वाचाः नवीन शैक्षणिक धोरणः मूलभूत बदल की नवीन जुमलेबाजी?

इंटर्नशिप केली तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्रः नव्या तरतुदीनुसार, पारंपरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कला, वाणिज्य आणि विज्ञान या विद्या शाखांतील पदवीस्तरावरील अभ्यासक्रमांनाही इंटर्नशिप बंधनकारक असेल. श्रेयांक पद्धतीत पदवी अभ्यासक्रमाच्या १३२ श्रेयांकापैकी २० टक्के श्रेयांक इंटर्नशिप असतील. ज्या विषयात पदवी घ्यायची आहे, त्यातील मुख्य विषयासाठी एकूण सर्व श्रेयांकापैकी २४ श्रेयांक असतील. इंटर्नशिप केलेले विद्यार्थीच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतील. विद्यार्थी शिकत असलेले विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेच्या आवारात प्रशिक्षणार्थी म्हणून केलेले काम इंटर्नशिप ग्राह्य धरण्यात येणार नाही. विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था शेवटचे सत्र इंटर्नशिपसाठी राखीव ठेवू शकतील, असे यूजीसीने म्हटले आहे.

…पण संधी देणार कोण?: काही विद्या शाखांची ओळख ही फक्त शैक्षणिक बाबींपुरतीच मर्यादित असल्यामुळे या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. या अभ्यासक्रमांबाबतचा दृष्टिकोन बदलून विद्यार्थी रोजगारक्षम व्हावेत म्हणून इंटर्नशिपची तरतूद करण्यात आली आहे, असे यूजीसीचे म्हणणे आहे. प्राप्त परिस्थितीत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाच सहजासहजी इंटर्नशिपची संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी कोण देणार? हा खरा प्रश्न आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा