युद्ध भडकलेः रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त, रशियाचे ५० सैनिकही गारद

0
256

कीव, युक्रेनः गेल्या काही महिन्यांपासून वर्तवण्यात येत असलेली रशिया- युक्रेन युद्धाची भीती अखेर गुरूवारी खरी ठरली. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी हल्ल्यात ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. त्यात ११ लष्करी हवाई तळांचाही समावेश आहे. या युद्धात रशियाचे ५० आणि युक्रेनच्या ४० सैनिकांसह १० नागरिकही ठार झाले आहेत. रशियाचे सैनिक युक्रेनची राजधानी कीवची बाह्य सीमा ओलांडून पुढे घुसले आहेत. रशियन सैनिकांनी उत्तर कीवमधील चेर्नोबील अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला आहे. रशियाच्या या युद्धखोरीचा पाश्चात्य देशांनी निषेध केला असून रशियावर आणखी निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. या घडामोडींमुळे युद्धाची पडछाया जगभर पसरली आहे. युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे तिसऱ्या जागतिक महायुद्धाची शक्यता बळावली आहे.

 आठ वर्षांपूर्वी क्रिमियाचा घास घेतलेल्या रशियाने युक्रेनच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून मोठा फौजफाटा तैनात केला होता. युक्रेनला आपल्या प्रभावक्षेत्रात कायम ठेवण्यासाठी रशिया लष्करी आक्रमणाचा मार्ग निवडेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. ती खरी ठरवत रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी गुरूवारी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. पुतीन यांच्या घोषणेनंतर काही क्षणातच रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ले चढवले. प्रारंभी हवाई हल्ले करत युक्रेनचे लष्करी तळ लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात युक्रेनचे ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यात ११ हवाई तळांचाही समावेश आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमीर झेलेन्स्की यांनी रशियाशी असलेले सर्व राजनैतिक संबध तोडून युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू केला आहे. युक्रेनी लोकांना स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची मुभा देण्याची घोषणाही त्यांनी केली. रशियाशी नेटाने लढण्याचा निर्धारही झेलेन्स्की यांनी व्यक्त केला खरा, परंतु रशियाच्या शक्तीशाली सैन्यापुढे युक्रेनची संरक्षण यंत्रणा तोकडी पडली. रणगाडे आणि शस्त्रसज्ज रशियन सैनिकांच्या हल्ल्यानंतर युक्रेनची राजधानी कीवसह अन्य शहरांत जीव वाचवण्यासाठी लोकांची एकच धावाधाव सुरू झाली. त्यामुळे अनेक शहरांत वाहतुकीची मोठी कोंडी झाली.

 युक्रेनची राजधानी कीवच्या उत्तरेला असलेला चेर्नोबील अणुऊर्जा प्रकल्प रशियन सैन्याने ताब्यात घेतला आहे. युक्रेनच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने रशियाच्या या कब्जाला दुजोरा दिला आहे. १९८६ मध्ये चेर्वोबील अणुऊर्जा प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली होती. या संघर्षात रशियाची सहा लढाऊ विमाने आणि दोन हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाने युक्रेनवर ३० हून अधिक हल्ले केल्याची माहिती युक्रेनच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचाः युक्रेन-रशिया युद्धानंतर महाराष्ट्रातही हालचाली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या या सूचना

 युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ऍडव्हायझरीः युक्रेनमधील भारताचे राजदूत पार्थ सत्पथी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनमधील भारताचा दूतावास सतत तत्पर आणि कार्यरत आहे. युद्धामुळे हवाई मार्ग बंद झाल्यामुळे भारताकडून पाठवण्यात आलेली विशेष विमाने कीवपर्यंत पोहोचू शकली नाहीत. त्यांना माघारी फिरावे लागले. अशा परिस्थितीत युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिकांनी जिथे आहात, तिथेच थांबा, जवळच्या बॉम्बरोधक शिबिरांमध्ये आश्रय घ्या, असे आवाहन सत्पथी यांनी केले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

अमेरिकेची रशियाला धमकीः युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांना थेट धमकी दिली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी ठरवून हा हल्ला घडवून आणला आहे. आम्ही रशियाच्या या कृतीचा निषेध करतो. पुतीन यांच्याकडे चर्चेचा पर्याय खुला होता. मात्र त्यांनी युद्धाचा मार्ग निवडला. याचे परिणाम त्यांना  आणि त्यांच्या देशाला भोगावे लागतील. कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्यावर हल्ला करून तो देश काबीज करण्याची वृत्ती आम्ही मान्य करणार नाही. हे मनसुबे हाणून पाडण्यासाठी आम्ही रशियाविरुद्ध ठामपणे उभे राहू, असे बायडेन यांनी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात म्हटले आहे. युक्रेनमध्ये आम्ही सैन्य पाठवणार नाही, परंतु नाटो देशांच्या इंच इंच भूमीचे रक्षण करणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो, असे सूचक वक्तव्यही बायडेन यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा