युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये घुसले रशियन सैन्य, झेलेन्स्की सरकार उलथवण्याची पुतीन यांची खेळी

0
123
प्रातिनिधिक छायाचित्र.

कीव्हः रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तुंबळ युद्ध सुरू असतानाच शुक्रवारी रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये घुसले. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने स्वतःच एका निवेदनाद्वारे रशियन सैन्याचे रणगाडे, लष्करी गाड्या कीव्हच्या रस्त्यावरून फिरत असल्याचे दाखवले आहे. दरम्यान, बलाढ्य रशियाशी युक्रेनचे सैन्य नेटाने आणि गनिमी काव्याने लढा देत असून युक्रेनच्या प्रतिहल्ल्यात रशियाचे एक हजारापेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. दुसरीकडे राजधानी कीव्हमध्ये आपले सैनिक घुसल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी सर्वात मोठी चाल खेळली असून त्यांनी थेट युक्रेनच्या सैन्यालाच युक्रेनमधील झेलेन्स्की सरकार उलथवून टाकून सत्ता हाती घेण्याचे आवाहन केले आहे.

 रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी गुरूवारी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर काही क्षणातच रशियन सैन्याने युक्रेनवर चौफेर हल्ले चढवण्यास सुरूवात केली. तेव्हापासून युक्रेन आणि रशियामध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील अनेक शहरे या युद्धात होरपळली आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत रशियन सैन्याने बेलारूस मार्गे युक्रेनची राजधानी कीव्हची नाकेबंदी केली होती. रशियाने कीव्हच्या बाहेरील भागात असलेल्या गोस्टोमेल हवाई तळावरही ताबा मिळवल्याचे वृत्त आहे. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून युक्रेनने त्याच्या नागरिकांना लष्करात दाखल होण्याचे आवाहन केले आहे. रशियन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनने आपल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रे वाटल्याचेही वृत्त आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 युक्रेन आणि रशियामध्ये पेटलेल्या युद्धाला विराम मिळावा म्हणून जागतिक पातळीवरून विविध मार्गांनी रशियावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी सर्वांनाच चक्रावून टाकणारी खेळी खेळली आहे. पुतीन यांनी रशियन सरकारच्या  आरटी टीव्ही या अधिकृत दूरचित्रवाणीद्वारे थेट युक्रेनच्या सैन्यालाच संबोधित केले आहे. झेलेन्स्की सरकार उलथवून टाकून युक्रेनची सत्ता हातात घेण्याचे आवाहन त्यांनी युक्रेनी सैन्याला केले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांची दहशतवादी, नवनाझी, ड्रग ऍडिक्ट अशी संभावना करत पुतीन यांनी युक्रेनी सैन्याला हे सरकार उलथवण्याचे आवाहन केले आहे. ड्रग ऍडिक्ट आणि नवनाझींच्या टोळीच्या तुलनेत आम्हाला तुमच्याशी जुळवून घेणे सोपे जाईल, असे पुतीन यांनी म्हटले आहे.

युक्रेनच्या गनिमी काव्याने पुतीन हादरलेः दरम्यान, बलाढ्य रशियाशी युक्रेनचे सैन्य नेटाने लढा देत आहे. युक्रेनी सैन्याच्या गनिमी काव्याच्या लढ्यामुळे व्लादीमीर पुतीन यांना हादरा देणारी माहिती समोर येत असून युक्रेनने केलेल्या प्रतिहल्ल्यात रशियाचे एक हजारांहून अधिक सैनिक ठार झाले आहेत, असा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध कोणते वळण घेणार हे  सध्यातरी स्पष्ट नसले तरी युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने महत्वाचा दावा केला आहे. रशियाच्या हल्ल्याला आमचे सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. आमच्या प्रतिहल्ल्यात आतापर्यंत रशियाचे एक हजारापेक्षा जास्त सैनिक मारले गेले आहेत, असे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया मार्गे आणण्याचे प्रयत्नः युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न गतीमान झाले आहेत. सुमारे ४७० भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया सीमेच्या रस्ते मार्गे आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे भारतीय विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही जयशंकर यांच्यावर दबाव टाकला होता. दरम्यान, एका मीडिया रिपोर्टनुसार ४० भारतीय विद्यार्थी युक्रेन-पोलंड सीमेपर्यंत पायी चालत पोहोचले आहेत. त्यांच्या महाविद्यालयाच्या बससने त्यांना सीमेपासून सुमारे ८ किलोमीटर दूर सोडले होते. युक्रेनमध्ये सुमारे १६ हजार भारतीय आहेत. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा