युक्रेन- रशिया युद्धः खारकीववर रशियाचे बॉम्बहल्ले, दोस्त राष्ट्रांची ७० लढाऊ विमाने युक्रेनच्या ताफ्यात

0
226

कीव्ह, युक्रेनः रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच युक्रेनची राजधानी कीव्हसह युक्रेनमधील महत्वाच्या शहरांकडे रशियन फौजांची होणारी घौडदौड कमी करण्यात युक्रेनी फौजांना काही प्रमाणात यश आले आहे. दरम्यान, युक्रेनमधील महत्वाचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकीववर रशियन फौजांनी बॉम्बहल्ले केले. त्यात ११ नागरिक ठार झाल्याचे युक्रेनने म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनला दोस्त राष्ट्रांकडून मदतीचा ओघ सुरू झाला असून बुल्गारिया, पोलंड, स्लोवाकिया या देशांनी युक्रेनच्या मदतीसाठी लढाऊ विमाने पाठवली आहेत. त्यात मिग-२५ विमानांचाही समावेश आहे. कॅनडानेही रणगाडाविरोधी शस्त्रे पाठवण्यास सुरूवात केली आहे.

रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत ३५२ सर्वसामान्य नागरिक ठार झाले आहेत. त्यात १४ बालकांचाही समावेश आहे, असे युक्रेनने म्हटले आहे. रशियन फौजांचा एक मोठा काफीला युक्रेनची राजधानी कीव्हच्या दिशेने आगेकुच करत आहे. दरम्यान, रशियाच्या या हल्ल्यामुळे जीवाच्या भीतीने पाच लाखांहून अधिक युक्रेनी नागरिक युक्रेन सोडून पोलंड, हंगेरी, रोमानिया, माल्दोवा आणि स्लोवाकियामध्ये शरण गेले आहेत.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कीव्ह आणि खारकीव्ह या दोन शहरांदरम्यान असलेल्या ओखतिर्का येथील लष्करी तळावर रशियाने केलेल्या हल्ल्यात  युक्रेनचे ७० सैनिक मारले गेले आहेत. येथे झालेल्या संघर्षात रशियाचेही सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे, मात्र नेमके किती सैनिक मारले गेले, याचा आकडा समोर आलेला नाही. दरम्यान, युक्रेनला दोस्त राष्ट्रांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. युक्रेनच्या ताफ्यात दोस्त राष्ट्रांची ७० मिग-२९ विमाने दाखल झाली. युक्रेनला बुल्गेरियाने १६ मिग-२९ आणि १३ सुखोई लढाऊ विमाने दिली आहेत. पोलंडने २८, स्लोव्हाकियाने १२ मिग-२९ लढाऊ विमाने दिली आहेत.

 युक्रेनवर रशियाने हल्ला केल्याचा आजचा पाचवा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून रशियाच्या या अतिक्रमणाचा निषेध केला जात असतानाच रशिया सातत्याने एकटा पडत जात असल्याचे चित्र पहायला मिळू लागले आहे. दुसरीकडे युक्रेनच्या फौजांकडून रशियन फौजांना अनपेक्षित तीव्र प्रतिकारालाही सामोरे जावे लागत आहे. स्वतःच्या भूमित रशियाला आर्थिक अस्थिरतेलाही सामोरे जावे लागत आहे. युक्रेन पूर्णतः तटस्थ राहिला आणि त्याचे पूर्णतः असैन्यीकीकरण केले गेले तेव्हाच युद्धविराम होऊ शकतो, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी बोलताना म्हटले आहे.

 रशियाची फिफा वर्ल्ड कपमधून हकालपट्टीः रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अनेक देशांकडून निर्बंध लादले जात असतानाच फुटबॉलमधील शिखर संस्था फिफाने रशियाची  २०२२ च्या फुटबॉल विश्वचषकातून हकालपट्टी केली आहे. फिफापाठोपाठच युरोपीयन फुटबॉल संघानेही रशियावर बंदी घातली आहे. हा रशियाला मोठा धक्का मानला जात आहे. यावर्षी कतारमध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक होणार आहे. रशियाच्या फुटबॉल क्लब्सना जगातील सर्व स्पर्धांमध्ये खेळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. रशियाचा फुटबॉल क्लब स्पोर्ट्स मॉस्कोला युरोपीयन लीगमधून बाहेर करण्यात आले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

१८२ भारतीयांना घेऊन सातवे विमान मुंबईतः युक्रेनमध्ये अडकलेले १८२ लोक मुंबईत दाखलः युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ लोकांना घेऊन एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान मंगळवारी बुखारेस्टहून मुंबई विमानतळावर दाखल झाले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा ही विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत आज मुंबई विमानतळावर दाखल झालेले हे सातवे विमान आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा