युक्रेनने रशियाचे एसयू-२५ विमान पाडले; रशियाचे २५० रणगाडे आणि १० हजार सैनिक मारलेः युक्रेन

0
144
छायाचित्र सौजन्यः twitter/@nexta_tv

कीव्हः रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आठवडाभर उलटला असून युक्रेनने रशियाचे आणखी एक एशयू-२५ विमान पाडल्याचे वृत्त नेक्स्टा टीव्हीने दिले आहे. दरम्यान, आतापर्यंत रशियाचे २५० रणगाडे उडवण्यात आले आणि १० हजारांहून जास्त सैनिक ठार केल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

 रशियाने युक्रेनमध्ये असलेल्या युरोपातील सर्वात मोठ्या झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला आहे. या हल्ल्यानतंर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांच्याशी बातचित केली. या हल्ल्यानंतर ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठक बोलावली. हा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित असल्याचे युक्रेनने म्हटले आहे.

रशियाने युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी रशिया आण्विक दहशत पसरवत असल्याचा आरोप केला आहे. पुतीन यांना चेर्नोबिल आपत्तीची पुनरावृत्ती करायची आहे, असा आरोपही झेलेन्स्की यांनी केला आहे.

आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या युक्रेन आणि रशियाच्या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे २२७ नागरिक ठार झाले आहेत तर ५२५ नागरिक जखमी झाले आहे, असा संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे.

 दुसरीकडे युद्ध संपवण्यासाठी बोलणी करण्यास रशिया तयार आहे, मात्र युक्रेनची लष्करी आधारभूत संरचना नष्ट करण्याचे आमचे प्रयत्न सुरू राहतील, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅवरॉव्ह यांनी म्हटले आहे. पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला कायम शस्त्र पुरवठा केला आहे. त्यांच्या फौजांना प्रशिक्षण दिले आहे आणि युक्रेनचे रुपांतर रशियाविरोधी तटबंदीत करण्यासाठी तेथे आपले तळ बांधले आहेत, असा आरोपही लॅवरॉव्ह यांनी केला आहे. आपल्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यामुळे रशियाला युक्रेनविरुद्ध कारवी करणे भाग पडले, असा दावाही त्यांनी केला आहे.

मोलोटोव्ह कॉकटेलने रशियन फौजा हैरानः युक्रेनच्या अनेक शहरात रशियन फौजांकडून बॉम्बहल्ले सुरू आहेत. बलाढ्या रशियन सैन्याने युद्धाच्या दुसऱ्या- तिसऱ्या दिवशीच युक्रेनच्या हवाई क्षेत्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र हल्ल्याची तीव्रता वाढवूनही जमिनीवर रशियाला म्हणावे तसे प्रभुत्व मिळवता आले नाही. युक्रेनमध्ये शिरकाव करताना रशियन फौजांना स्थानिक नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. शस्त्रसामग्री हाती नसणारे युक्रेनीयन नागरिक मोलोटोव्ह कॉकटेल अर्थात ज्वलनशील बॉम्बफेकीने शहरांच्या वेशीवर रशियाशी झुंज देत आहेत. त्यामुळे रशियन सैन्य हैरान आहे. मोलोटोव्ह कॉकटेल म्हणजे ज्वलनशील घटकाने भरलेली काचेची बाटली. ती हाताने भिरकावल्यास आग लावण्यास पुरेशी ठरते. कठीण पृष्ठभागावर आदळ्यास क्षणार्धात तिचा स्फोट होऊन भडका उडतो.

झेलेन्स्की यांना ठार मारण्याचे रशियाचे तीन प्रयत्न फसलेः युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना ठार मारण्याचे रशियाचे तीन प्रयत्न फसले. रशियाने झेलेन्स्की यांच्यावर तीन प्राणघातक हल्ले केले, त्यातून ते सहीसलामत बचावले, असा दावा लंडनच्या द टाइम्सने केला आहे. झेलेन्स्की एका बंकरमध्ये सुरक्षित रहात आहेत. युक्रेनच्या नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे.

झेलेन्स्की यांना ठार मारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांचे प्रमुख सहकारी येवगेनी प्रिगोझीन यांच्या नियंत्रणाखाली वॅगनर ग्रुप या सुरक्षा कंपनीचे भाडोत्री सैनिक आणि चेचेन स्पेशल फोर्स पाठवण्यात आली होती. रशियाच्या सुरक्षा सेवेच्या युद्धविरोधी सदस्यांनी या योजनेबाबत युक्रेनला माहिती दिली होती. म्हणजेच युक्रेन सरकारकडे ही माहिती रशियामधूनच पोहोचली होती. झेलेन्स्की यांच्या सुरक्षा टीमला याची संपूर्ण माहिती आधीच मिळाली होती, हे ‘भयानक’ आहे, असे वॅगनर समूहाच्या नजीकच्या सूत्रांनी टाइम्सला सांगितले. शिवारी झेलेन्स्की यांना ठार मारण्याच्या एका प्रयत्नात कीव्हच्या बाहेरील भागातच चेचेन हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला. हत्येच्या प्रयत्नांमुळे वॅगनर समूहाचे मोठे नुकसान झाल्याचा दावाही टाइम्सने केला आहे. रशियाला युक्रेनवर कब्जा करणे सोपे जावे म्हणून पुतीन यांच्या आदेशानुसार झेलेन्स्कींसह २३ अन्य सरकारी अधिकाऱ्यांचा खात्मा करण्याची योजना वॅगनर समूहाने आखली होती, असेही या वृत्तात म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

रशियाविरुद्ध बोलण्यास चौथ्यांदा भारताचा नकारः संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) रशियाविरोधात बोलण्यापासून भारताने चौथ्यांदा पाठ फिरवली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईची चौकशी करण्याच्या प्रस्तावावरील मतदानातही भारताने भाग घेतला नाही. यूएनएचआरसीने युक्रेनविरुद्ध रशियाच्या लष्करी कारवाईची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यूएनएचआरसीने बहुमताने हा निर्णय हा घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा