ठाकरेंची ‘मातोश्री’ बॉम्बने उडवून देण्याची दाऊदच्या हस्तकाची धमकी,’वाघा’ला ललकारले!

0
536
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान वांद्र्याच्या कलानगरातील ‘मातोश्री’ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दाऊदच्या हस्तकाने फोन करून दिल्यामुळे एकच खळबळ उडाली असून मातोश्रीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदच्या हस्तकाने दुबईहून मातोश्रीवर चार कॉल केले आणि मातोश्री बंगला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या निनावी फोनमुळे मातोश्री परिसरात एकच धावपळ उडाली असून पोलिसांनी बंगल्याची सुरक्षा वाढवली आहे.

 आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मातोश्रीवर हे निनावी फोन कॉल आले. आपण कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा हस्तक असल्याचा दावा हा निनावी फोन करणाऱ्याने केला. मातोश्री बंगल्यावर कर्तव्यावर असलेल्या पोलिस ऑपरेटरनेच हे फोन कॉल घेतले, असेही सांगण्यात येते. या फोन कॉलनंतर मातोश्रीला तातडीने विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

 फोन आला, पण मुख्यमंत्र्यांशी बोलायचे म्हणालाः शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी मातोश्रीवर फोन आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. समोरच्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे असे सांगितले होते. त्याने मातोश्री बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली नाही. हा फोन कुणी केला आणि कशासाठी केला होता आणि फोन करणारा दाऊदच्या गँगचा हस्तक आहे का, याचा पोलिस तपास करतील, असे परब म्हणाले. मातोश्रीला धमकी देण्याची हिंमत आजवर कुणी केली नाही आणि कुणी जर दिलीच तर तो सुटणार नाही, असेही परब म्हणाले.

मातोश्रीकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास खपवून घेणार नाहीः गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनीहा मातोश्रीवर आलेल्या फोन प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मातोश्री हे शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आहे. या निवासस्थानाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास खपवून घेतले जाणार नाही, असे मी एक शिवसैनिक म्हणून सांगतो, असे ते म्हणाले. कॉल करणाऱ्याला धडा शिकवला जाईल, असेही ते म्हणाले.

शिवसैनिक धमक्यांना भिक घालत नाहीतः मातोश्री उडवून देण्याची धमकी आल्याचे आम्ही ऐकले आहे. अशा धमक्या येत असतात. शिवसैनिक अशा धमक्यांना भिक घालत नाहीत. ज्याने कुणी हा खुळचटपणा केला आहे, त्याला पोलिस शोधून काढतील. पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा