ठेवीदारांना दिलासाः बँक दिवाळखोरीत निघाली तरी ९० दिवसांत मिळणार पैसे परत!

0
104
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः बँकेमध्ये ठेवी असलेल्या बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. बँकेवर निर्बंध लागू झाले किंवा बँक दिवाळखोरीत निघाली तरी ठेवीदारांना ९० दिवसांत त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ठेवी संरक्षण आणि कर्जहमी महामंडळ म्हणजेच डीआयसीजीसी दुरूस्ती विधेयक २०२१ ला मंजुरी दिली आहे. संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनातच हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या दुरूस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. या दुरूस्ती विधेयकात सर्व श्येड्यूल्ड बँका, सहकारी बँका, विदेशी बँकांच्या देशातील सर्व शाखा, लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, स्थानिक बँका आणि निर्बंध लागू झालेल्या बँकांचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, लक्ष्मीविलास बँक आणि येस बँकेच्या ठेवीदारांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

 बँकांतील ठेवींना भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्णतः मालकी असलेले ठेवी संरक्षण आणि कर्जहमी महामंडळ विमा संरक्षण देते. या महामंडळाकडून ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण दिले जाते. त्यामुळे बँक दिवाळखोरीत निघाली किंवा बँकेवर निर्बंध लादले तरी विमा संरक्षणानुसार ग्राहकांना रक्कम देण्यात येते. मात्र ही रक्कम बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर किंवा तिच्या लिक्विडेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दिली जाते. आता नव्या दुरूस्तीनुसार ठेवीदारांना ९० दिवसांतच त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.

डीआयसीजीआय कायद्यातील दुरूस्तीनंतर ज्या ठेवीदारांनी पीएमपी बँक आणि अन्य छोट्या सहकारी बँकांमध्ये आपल्या जन्मभराची कमाई असलेल्या ठेवी ठेवल्या आहेत, त्यांना लगेच दिलासा मिळणार आहे. डीआयसीजीसी ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पूर्णतः मालकीची सहायक कंपनी आहे. ही कंपनी बँक ठेवींवर विमा कवच देते. नव्या दुरूस्तीमुळे ९३.३ टक्के बँक खातेधारक पूर्णतः सुरक्षित होतील, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा