नारायण राणेंना जनआशीर्वाद यात्रेत बसला ‘जोरदार शॉक’!

0
752
screen shot from video

कणकवलीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि त्यामुळे स्थगीत झालेली त्यांची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारपासून पुन्हा सुरू झाली. ही यात्रा रत्नागिरीतून सिंधुदुर्गात पोहोचल्यानंतर राणे यांना विजेचा जोरदार शॉक बसला. मात्र राणे यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात पोहोचल्यानंतर राणे यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी विद्युत रोशनाई करण्यात आली होती. त्यावेळी राणे यांना एके ठिकाणी विजेचा जोरदार शॉक लागला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात  कैद झाला आहे.

कणकवलीमध्ये दाखल झाल्यानंतर राणे यांनी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या रेलिंगवर विद्युत रोशनाई करण्यात आली होती. त्यातील एका रेलिंगवर राणे यांनी आधारासाठी हात ठेवला आणि त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला. राणे यांनी तातडीने हात झटकून काढून घेतला.

नारायण राणे यांना ज्यावेळी विजेचा शॉक लागला, तेव्हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्या सोबतच होते. त्यांनी राणे यांना शॉक लागल्याचे पाहिले आणि तेही सावध झाले. त्यांनी आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनाही येथे करंट असल्याचे सांगत सावध होण्यास सांगितले. या घटनेनंतर राणे यांनी संबंधितांना सूचना देत तत्काळ दुरूस्तीचे आदेश दिले आहेत. राणे यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली तरी भरपावसाळ्यात कार्यकर्त्यांची विद्युत रोशनाईची हौस किती महागात पडू शकली असती, याची कल्पना यावरून येते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा