विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारचः सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्वाळा

0
976
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, परीक्षेची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. मात्र राज्य सरकारे परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्णयाला युवा सेनेसह देशभरातील विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरील निर्णय १८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता.

 न्यायमूर्ती अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी आणि एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने याबाबतचा निकाल आज दिला. प्रारंभीपासूनच विद्यापीठ अनुदान आयोग विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांना ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याची मुदत दिली होती. मात्र ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे अनिवार्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. विद्यापीठ अनुदान आयोगाने ६ जुलै रोजी विद्यापीठांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यात ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे अनिवार्य असल्याचे म्हटले होते. यूजीसीच्या या निर्णयाला महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिशा सरकारने आव्हान दिले होते.

एखाद्या राज्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असेल तर विद्यापीठ अनुदान आयोगाकडे दाद मागण्याचा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत राज्य सरकारे परीक्षा पुढे ढकलू शकतात. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाशी चर्चा करून त्यांना परीक्षेची नवीन तारीख निश्चित करावी लागेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा राज्य सरकारांचा निर्णय देशाच्या उच्च शिक्षणाच्या दर्जासाठी घातक आहे. सीबीएसई, आयसीएसई परीक्षांशी तुलनाच होऊ शकत नाही. परीक्षा विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत उतरण्याचा आत्मविश्वास देतात. त्यामुळे परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती दिली जाऊ शकत नाही, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मांडली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा