अमेरिका-चीन तणाव वाढला, ट्रम्प प्रशासनाने घातली चीनी विमानांवर अमेरिकेत बंदी

0
35
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः चीन आणि अमेरिकेतील वाढता तणाव आणि सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चीनी विमान कंपन्यांच्या अमेरिकेतील उड्डाणावर बंदी घातली आहे. १६ जूनपासून चार चीनी विमान कंपन्यांना अमेरिकेत येऊ दिले जाणार नाही आणि अमेरिकेतून उड्डाणेही घेऊ दिली जाणार नाहीत, असे अमेरिकेच्या परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोना संसर्गाचे संकट वाढल्यानंतर चीनने या आधीच अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्स आणि डेल्टा एअरलाइन्स या दोन विमान कंपन्यांवर बंदी घातली होती. ही बंदी चीनने अद्याप उठवलेली नाही. या विमान कंपन्यांवरील बंदी हटवली नसल्यामुळे अमेरिकेने प्रत्युरादाखल चीनच्या चार विमान कंपन्यांवर बंदी घातली आहे.

चीनचे पाऊल दोन्ही देशांदरम्यानच्या कराराचे उल्लंघन आहे. दोन्ही देशांतील विमान कंपन्यांना एकमेकांच्या देशात कामकाज करण्यास सूट राहील, अशी तरतूद दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारात असल्याचा दावा अमेरिकेच्या परिवहन मंत्रालयाने केला आहे.

अमेरिकेचे परिवहन मंत्रालय चीनशी चर्चा सुरूच ठेवेल. दोन्ही देशांतील विमान कंपन्यांना दुहेरी अधिकाराचा पूर्ण वापर करण्याचा हक्क मिळावा,अशी अमेरिकेची इच्छा असल्याचे परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून चीनच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास आणि चीनी विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घेण्यासही बंदी घातली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा