अमेरिकेच्या इतिहासात अभूतपूर्व घटनाः ट्रम्पविरुद्ध महाभियोग चालवणार त्यांच्याच कॅबिनेटचे सदस्य!

0
263
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून धुडगूस घालत हिंसाचार केल्यानंतर आता ट्रम्प यांच्या कॅबिनेटमधील काही सदस्यच त्यांच्याविरोधात उभे टाकले आहेत. २० जानेवारी रोजी कार्यकाळ संपण्याआधीच ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांच्याच कॅबिनेटमधील काही सदस्यांनी केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांच्याच कॅबिनेटमधील सदस्यांकडून होण्याची अमेरिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

सीएनएन. कॉमने दिलेल्या वृत्तानुसार काही सदस्यांच्या मागणीवरून कॅबिनेटची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवण्याच्या मुद्यावर चर्चा सुरु आहे. या प्रस्तावाच्या बाजूने ट्रम्प यांच्या कॅबिनेटमधील नेमके किती सदस्य आहेत, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री ट्रम्प समर्थकांनी संसदेचा परिसर असलेल्या कॉपिटॉल हिलमध्ये घुसले आणि त्यांनी धुडगूस घालत तोडफोड केली. ट्रम्प यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करत गोळीबार केला. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. याच मुद्यावर ट्रम्प यांना २० जानेवारी रोजी कार्यकाळ संपण्याआधीच त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचाः अमेरिकेच्या संसदेत घुसून धुडगूस घालत ट्रम्प समर्थकांचा हिंसाचार, गोळीबारात १ ठार

तत्पूर्वी अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत रिपब्लिकन पार्टीच्या सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालांना आव्हान दिले. विविध राज्याच्या इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांनी निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्षपणे झाल्याचा निर्वाळा दिल्यानंतरही रिपब्लिकन पार्टीच्या सदस्यांनी ते मान्य केले नाही. त्यांनी या मुद्यावर चर्चा आणि मतविभाजनाची मागणी केली.

विशेष म्हणजे अमेरिकेच्या संविधानातील तरतुदींनुसार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच प्रतिनिधी सभा आणि सिनेटच्या संयुक्त बैठकीत प्रत्येक राज्याच्या इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य निवडणूक निकाल प्रमाणित करतात आणि त्यानंतर विजयी झालेल्या उमेदवाराला विजयाचे प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र, एखादा सदस्य निवडणूक निकालाशी असहमत असेल तर तो त्यावर चर्चा आणि मतदानाची मागणी करू शकतो. उपराष्ट्राध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते आणि तेच विजयाचे प्रमाणपत्र देतात.

आधीच बांधण्यात आलेल्या अंदाजाप्रमाणे रिपब्लिकन पार्टीच्या सदस्यांनी यावर चर्चेची मागणी केली. फक्त दोन राज्यांच्या निवडणुकीचे निकालच मान्य करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने १२ इलेक्टोरल वोट गेले. या दोन्ही राज्यात ट्रम्प यांचा विजय झाला.

निवडणुकीत कोणतीही अनियमितता झाली नाही, असे ऍरिझोना इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्याने सांगितले मात्र रिपब्लिकन पार्टीच्या सदस्यांनी त्यांचे म्हणणे फेटाळून लावले आणि मत विभाजनाची मागणी केली. त्यानंतर संयुक्त बैठक थांबवण्यात आली आणि दोन्ही सभागृहांची स्वतंत्र बैठक सुरू झाली. या बैठकीत चर्चा सुरू झाली आहे.

रिपब्लिकन पार्टीचे सदस्यच ट्रम्प यांच्या विरोधातः ऍरिझोना इलेक्टोरल कॉलेजच्या चर्चेची विशेष बाब म्हणजे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ सिनेटर मिच मॅकॉनल यांनीच या प्रस्तावाला विरोध केला. अशा प्रकारे निवडणुकीचे निकाल फेटाळले गेले तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासच उडून जाईल आणि लोकशाहीच्या दृष्टीने ते घातक ठरेल, असे मॅकॉनल म्हणाले. अन्य दोन रिपब्लिकन सिनेटर स्टीव्ह डेन्स आणि जेम्स लॅंक फोर्ड यांनीही या प्रस्तावाला विरोध केला. डेमॉक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बायडन यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे आणि त्यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले पाहिजे, असे हे दोघेही म्हणाले.

ऍरिझोनावरील मत विभाजनात बायडन जिंकलेः सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत ऍरिझोनावरील चर्चेनंतर मत विभाजन झाले. त्यात बायडन यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्याला विरोध करणारा प्रस्ताव फेटाळला गेला. बहुतांश सदस्यांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. त्यात रिपब्लिकन सदस्यांचाही समावेश आहे. निवडणूक निकालाला आव्हान देणाऱ्या प्रस्तावाच्या बाजूने २६ मते तर या प्रस्तावाला विरोध करण्याच्या बाजूने ८७ मते पडली. प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांमध्ये रिपब्लिकन सदस्यांचाही समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा