अमेरिकेच्या संसदेत घुसून धुडगूस घालत ट्रम्प समर्थकांचा हिंसाचार, गोळीबारात १ ठार

0
148
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवानंतर ज्या हिंसाचाराची भीती होती, तेच घडले. ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेची संसद असलेल्या कॅपिटॉल हिल बिल्डिंगमध्ये घुसून तोडफोड आणि हिंसाचार केला. यावेळी ट्रम्प समर्थक आणि पोलिसांत झटापट होऊन झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा अभूतपूर्व सत्तासंघर्ष पहायला मिळत आहे.

ट्रम्प समर्थक आणि पोलिसांत जवळपास चार तास झटापट झाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे चार वाजता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या हिंसाचारानंतर कॉपिटॉल इमारती भोवती सुरक्षा भक्कम करण्यात आली आहे. संसदेचे कामकाज सुरु झाले आहे. जो बायडन यांच्या विजयावर रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या आव्हानावर चर्चा सुरु झाली आहे.

जो बायडन यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यासाठी अमेरिकन खासदारांची बैठक सुरू असतानाच ट्रम्प समर्थक कॉपिटॉल इमारतीत घुसले आणि त्यांनी तोडफोड करत धुडगूस घालण्यास सुरूवात केली. जो बायडन यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्याआधी आम्ही कधीच पराभव मान्य करणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर ट्रम्प समर्थकांनी कॉपिटॉल बिल्डिंगमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि हिंसक निदर्शने केली. ट्रम्प समर्थकांची पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत एका महिलेचा मृत्यू झाला. अमेरिकेत घडलेल्या या अभूतपूर्व हिंसाचाराचा जगभरातील नेत्यांनी निषेध केला आहे.

अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्स आणि सिनेटने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेची संयुक्त बैठक बोलावली होती. डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्याचे यातून स्पष्ट झाले होते. परंतु निवडणुकीचे प्रारंभिक निकाल हात येऊ लागले तेव्हापासूनच पराभव मान्य करणारच नाही, असा हेका धरून बसलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी वॉशिंग्टनमध्ये आपल्या समर्थकांची रॅली केली आणि आपण कधीही पराभव मान्य करणार नाही, असे त्यांनी समर्थकांसमोर जाहीर केले.

या रॅलीच्या काही तासांनंतरच ट्रम्प समर्थक बॅरिकेड्स तोडून कॅपिटॉल बिल्डिंगच्या शिड्या चढू लागले. त्यानंतर दंगल नियंत्रक पोलिसांची पथके तैनात करण्यात आली. हा जमाव देशद्रोह्यांची घोषणाबाजी करत पुढे चाल करू लागला. थोड्याच वेळात हा जमाव कॉपिटॉल बिल्डिंगमध्ये घुसला. याच दरम्यान गोळीबाराचा आवाज ऐकू आला.

जो बायडन यांनी कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये झालेला हिंसाचार हा देशद्रोह असल्याचे म्हटले आहे. कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये जो धुडगूस आपण पाहिला, आपण तसे अजिबात नाहीत. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची छोटी संख्या आहे, हे मी स्पष्ट करू इच्छितो, असे बायडेन यांनी म्हटले आहे. युद्ध आणि संघर्षातून अमेरिकेने बरेच काही सहन केले आहे. आम्ही ठाम राहू आणि प्रबळ बनू, असे जो बायडन यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या भावी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी कॅपिटॉल बिल्डिंगमधील हिंसाचार संपुष्टात आणण्याच्या भावी राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या इराद्याचे समर्थन केले आहे. मी भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे समर्थन करते की, कॅपिटॉल आणि आमच्या देशातील लोकसेवकांवरील हल्ले संपुष्टात आणले पाहिजे. लोकशाही पुढे चालत राहिली पाहिजे, असे त्यांनी जे म्हटले आहे, त्याचेही मी समर्थन करते, असे ट्विट कमला हॅरिस यांनी केले आहे.

अमेरिकेत झालेल्या या अभूतपूर्व हिंसाचाराचा जगभरातील नेत्यांनी निषेध केला आहे. ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी निषेध करताना म्हटले आहे की, अमेरिकी काँग्रेसमध्ये लज्जास्पद दृश्य. संयुक्त राज्य अमेरिका जगभरात लोकशाहीसाठी ओळखली जाते. सत्तेचे शांततापूर्ण आणि व्यवस्थित हस्तांतरण झाले पाहिजे, असे जॉनसन यांनी म्हटले आहे.

ट्विटर, फेसबुककडून कारवाईः दरम्यान, या हिंचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ट्विटरने १२ तासांसाठी ट्रम्प यांचे अकाऊंट ब्लॉक केले असून त्यांचे तीन व्हिडीओ काढून टाकले आहेत. या व्हिडीओमुळे हिंसाचार भडकण्याची भीती असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. फेसबुकनेही ट्रम्प यांच्यावर कारवाई केली असून हिंसाचार सुरु असताना ट्रम्प संबोधित करत असतानाचा व्हिडीओ काढून टाकला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा