US Election2020: जो बायडेन आघाडीवर, विजयासाठी केवळ सहा मतांची गरज

0
91
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः अमेरिकेच्या ४५ व्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले असून डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी आघाडी घेतली असून त्यांना २६४ इलेक्टोरल वोट्स मिळाली आहेत. त्यांना विजयासाठी सहा मतांची गरज आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांना आता २१४ इलेक्टोरल वोट्स मिळाली आहेत. पराभव समोर दिसू लागताच निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत विद्यमान डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 अमेरिकेच्या अध्यक्षपदाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची झाली आहे. निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागताच डेमॉक्रेटिक उमेदवार जो बायडेन यांच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. प्रत्येक मताची मोजणी झाली पाहिजे, अशी भूमिका डेमॉक्रेटिक पक्षाने घेतली आहे. तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने मतमोजणी थांबवण्याची मागणी केली आहे.

अशातच ट्रम्प यांच्या कॅम्पेनने बुधवारी पेन्सिल्व्हानिया, जॉर्जिया आणि मिशिगनमध्ये मतमोजणीच्या विरोधात खटले दाखल केले आहेत. ट्रम्प यांनी मतमोजणीमध्ये गोंधळाचा आरोप केला आहे. कोरोना संकटामुळे पेन्सिल्व्हानियामध्ये तीन दिवसांपर्यंत उशिराने बॅलेट्स पोहोचले आहेत. विलंबाने आलेले हे बॅलेट्स मतमोजणीसाठी ग्राह्य धरावे की नाही याबाबतही खटला सुरु आहे.

याच दरम्यान, अमेरिकेच्या रस्त्यावर आंदोलनेही सुरु झाली आहेत. काऊंट एव्हरी वोटचे फलक हातात घेऊन बुधवारी रात्री फिलाडेल्फियामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरले होते.

 दुसरीकडे सहा इलेक्टोरल वोट्स असलेला नेव्हाडा बायडेन आणि ट्रम्प यांचे भवितव्य ठरवणार आहे. नेव्हाडामध्ये बायडेन आघाडीवर आहेत. सध्या त्यांच्याकडे २६४ इलेक्टोरल वोट्स आहेत. नेव्हाडामध्ये ते विजयी झाले तर त्यांचे एकूण इलेक्टोरल वोट्स २७० होतील, म्हणजेच ते विजयी होतील. दुसरीकडे ट्रम्प पेन्सिल्व्हानिया, नॉर्थ कॅरोलिना, अलास्का आणि जॉर्जियामध्ये आघाडीवर आहेत. या चार राज्यांत ट्रम्प विजयी झाले तर त्यांना एकूण ५४ इलेक्टोरल वोट्स मिळतील आणि त्यांच्या एकूण इलेक्टोरल वोट्सची संख्या २६८ होईल. या निवडणुकीत नेव्हाडा किंग मेकर ठरण्याची शक्यता असून साऱ्या जगाचे लक्ष येथील मतमोजणीकडे लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा