हिंसक जमावाला डोनाल्ड ट्रम्प म्हणाले ‘देशभक्त’, चिथावणी देत घडवला कॅपिटॉलमध्ये हिंसाचार

0
125
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेल्या अभूतपूर्व हिंसाचाराला मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच जबाबदार असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटाल बिल्डिंगमध्ये घुसून धुडगूस घालत तोडफोड आणि हिंसाचार केला. या हिंसक जमावाला डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘देशभक्त’ संबोधले आणि हिंसाचार घडवण्यासाठी जमावाला चिथावणी दिली.

भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री ट्रम्प यांचे समर्थक अमेरिकेची संसद असलेल्या कॉपिटॉल बिल्डिंगमध्ये घुसले. तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प शांतपणे हा तमाशा पहातच बसले नाहीत तर त्यांनी त्याही स्थितीत संतप्त जमावाला चिथावणी दिली. व्हाइट हाऊसच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना हिंसाचार थांबवण्यासाठी काही तरी करा, अशी विनंती केली. पण ट्रम्प शांत राहिले. त्याच्या आधी त्यांनी एक सभेला संबोधित करतानाही जमावाला हिंसाचारासाठी चिथावणी दिली.

 न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ज्यावेळी अमेरिकेची संसद असलेल्या काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांच्या म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटच्या संयुक्त बैठकीची अंतिम तयारी सुरु होती, तेव्हा ट्रम्प यांनीच आपल्या समर्थकांना चिथावणी दिली आणि त्यानंतर हिंसाचार सुरु झाला. वॉशिंग्टनमध्ये ज्यावेळी हिंसाचार होत होता, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प आपल्या कार्यालयात बसून टीव्हीवर हा सगळा तमाशा पहात बसले. त्यांनी हिंसाचाराच्या आधी आणि नंतरही जमावाला उकसवले.

हेही वाचाः अमेरिकेच्या इतिहासात अभूतपूर्व घटनाः ट्रम्पविरुद्ध महाभियोग चालवणार त्यांच्याच कॅबिनेटचे सदस्य!

ट्रम्प यांनी समर्थकांच्या सभेला संबोधित करताना ‘निवडणूक चोरण्यात आली आहे,’ असे म्हटले. तुम्ही कमजोरीने आपला देश पुन्हा हस्तगत करू शकत नाही, अशा शब्दांत जमावाला भडकावताना त्यांनी या जमावाला कॅपिटॉलच्या दिशेने जाण्यास सांगितले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हिंसाचार होत असतानाही नॅशनल गार्ड्सना पाचारण केले नाही. त्यांनी तोडफोड होत असताना त्यांच्या सहकार्यांनी विनंती करूनही जमावाला हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले नाही.

हा हिंसाचार सुरु असतानाच ट्रम्प यांनी एक व्हिडीओ जारी केला. त्यात सुरुवातीलाच त्यांनी ‘निवडणूक चोरण्यात आली आहे’, असे म्हटले. त्यांनी या हिंसक जमावाला ‘देशभक्त’ संबोधले. अन्यायाचा सामना करणाऱ्या लोकांकडून त्यांचा विजय हिरावून घेण्यात आला आहे, त्यामुळे हे घडत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. हा त्यांच्या तक्रारीचा दिवस असल्याचेही ट्रम्प म्हणाले. त्यामुळे हा जमाव अधिकच हिंसक झाला.

‘अशा प्रकारच्या गोष्टी आणि घटना तेव्हाच घडतात जेव्हा बऱ्याच दिवसांपासून अन्यायाचा सामना करणाऱ्या देशभक्तांकडून त्यांचा पवित्र आणि जबरदस्त विजय दुष्ट आणि अपमानजनक पद्धतीने हिरावून घेतला जात असतो’

  • डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून ते हिंसाचार आणि तोडफोड करणाऱ्या संतप्त जमावाला आणखीच भडकवत होते. आगीत तेल टाकत होते, हा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न करत नव्हते, हेच स्पष्ट होते. ट्रम्प यांनी जमावाच्या या हिंसाचाराचा निषेध करण्याऐवजी त्यांचे हे वर्तन योग्य ठरवले. त्यांना देशभक्त ठरवले.

हेही वाचाः अमेरिकेच्या संसदेत घुसून धुडगूस घालत ट्रम्प समर्थकांचा हिंसाचार, गोळीबारात १ ठार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वारंवार हिंसाचार रोखण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली, तरीही ट्रम्प गप्प राहिले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या माजी कम्युनिकेशन डायरेक्टर एलिसा फरा यांनीही त्यांना वारंवार विनंती केली. परंतु व्हाइट हाऊस या राष्ट्राध्यक्ष भवनाचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोज यांच्याशी बोलत राहिले. जे काही घडत आहे ते पाहून मेडोज हैरान होते.

मेडोज आणि व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना जमावाला पुढे न जाण्याचे आवाहन करण्याची विनंती केली. एवढेच नाही तर जेव्हा जमाव कॉपिटॉलमध्ये घुसत होता, तेव्हा नॅशनल गार्ड्सना पाचारण करण्याचा सल्लाही ट्रम्प यांनी धुडकावून लावला. परंतु व्हाइट हाऊसचे वकील सिपोलोन यांनी हस्तक्षेप केल्यानंतर नॅशनल गार्ड्सना पाचारण करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा