अमेरिकेत सत्तासंघर्ष तीव्रः निकाल मान्य करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा नकार, म्हणाले माझाच विजय!

0
529
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचा विजय झालेला असला तरी हा निकाल मान्य करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला असून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी मीच असून मला सात कोटी वैध मते मिळाली आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. सोमवारी निवडणूक निकालाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी ही भूमिका घेतल्यामुळे अमेरिकेतील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपलाच विजय होत होता, परंतु पोस्टल मतांची मोजणी सुरु झाल्यानंतर जो बायडेन यांनी आघाडी घेतली, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मतदानाच्या दिवशी रात्री आठ वाजल्यानंतरही बेकायदेशीरपणे मतदान सुरु होते. त्यावेळी हजारो मतदान झाले. परिणामी पेन्सिल्व्हानिया आणि इतर काही राज्यांत निवडणुकीचे निकाल बदलले असा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी पोस्ट मतदानावर आक्षेप घेत न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यामुळे अमेरिकेतील सत्तांतराच्या दुसरा अंक आता न्यायालयातच रंगण्याची शक्यता आहे. आपणाला ७ कोटी १० लाख वैध मते मिळाली असून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आपणच आहोत, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

 शुभेच्छा देण्याची १२४ वर्षांची परंपरा तुटणारः अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत उमेदवाराने विजयी उमेदवाराला विजयाच्या शुभेच्छा देण्याची १२४ वर्षे जुनी परंपरा यावेळी तुटण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प हे आपले उत्तराधिकारी विजयी उमेदवार जो बायडेन यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यास नकार देऊ शकतात, अशी शंका अमेरिकी माध्यमांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या राजकीय इतिहासात १८९६ मध्ये पहिल्यांदा पराभूत उमेदवाराने विजयी उमेदवाराला भावनिक शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून ही परंपरा सुरु आहे. त्यावेळी रिपब्लिकन पार्टीकडून विल्यम मॅकीन्ले तर डेमोक्रॅटिक पार्टीकडून विल्यम्स जेनिंग्स ब्रायन उमेदवार होते. दोघांमध्ये अटीतटीची निवडणूक झाली परंतु या निवडणुकीत ब्रायन पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी विल्यम मॅकीन्ले यांना भावनिक संदेश पाठवून विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा