बायडन यांनी रद्द केले ट्रम्प यांचे अनेक निर्णय, पाच लाख भारतीयांना मिळणार दिलासा

0
423
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः महासत्ता अमेरिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेताच राष्ट्राध्यक्ष जो बायडन कामाला लागले असून पदभार स्वीकारल्याच्या काही तासांतच त्यांनी १७ अध्यादेशांवर स्वाक्षऱ्या करत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांना केराची टोपली दाखवली आहे. स्थलांतरितांना रोखण्याचा ट्रम्प यांचा निर्णयही बायडन यांनी रद्द केला असून त्यामुळे जवळपास पाच लाख भारतीयांना दिलासा मिळणार आहे.

२०१६ मध्ये ट्रम्प यांनी स्थलांतरितांना रोखण्याची घोषणा केली होती. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले होते. मात्र बायडन यांनी या धोरणात ऐतिहासिक बदल केला आहे. त्यामुळे अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून बायडन यांच्या या निर्णयामुळे सुमारे पाच लाख भारतीयांना दिलासा मिळणार आहे.

बायडन यांच्या नव्या निर्णयानुसार १ जानेवारी २०२१ पर्यंत अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांची पार्श्वभूमी तपासण्यात येणार आहे. हे स्थलांतरित नागरिक काही निकष पूर्ण करत असतील तर त्यांना पाच वर्षांसाठी कायदेशीर मान्यता दिली जाईल किंवा ग्रीन कार्ड दिले जाणार आहे.

काही महत्वाचे अध्यादेश असेः

  • बायडन यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासही सप्टेंबर महिन्यापर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
  • कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या अध्यादेशावरही बाडयन यांनी स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेत पुढील १०० दिवस मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. बायडन यांनी तो रद्द केला असून आता अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेची सभासद होणार आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहुल आणि आफ्रिकन देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवास बंदी केली होती. बायडन यांनी ही बंद उठवली आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर भींत बांधण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णयही बायडन यांनी रद्द केला असून या प्रकल्पाला देण्यात येणारा निधी थांबवला आहे. मेक्सिकोनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा