भक्तांनी घडवलेल्या हिंसाचाराचा ट्रम्प यांच्याकडून निषेध, परंतु चिथावणीखोर भाषणावर मौन

0
117
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः कॅपिटॉल बिल्डिंग म्हणजेच अमेरिकेच्या संसद भवनात बुधवारी आपल्या भक्तांनी केलेल्या हिंसाचाराचा आणि तोडफोडीचा मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केला आहे. मात्र आपल्या चिथावणीखोर भाषणाबद्दल त्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही. अमेरिका हे नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचे राज्य असायला हवे. आता सहज, सुव्यवस्थित आणि अखंडपणे सत्तेचे हस्तांतरण करण्यावर आपले लक्ष असणार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या संसदेत बुधवारी प्रतिनिधी सभा आणि सिनेटच्या संयुक्त बैठकीत इलेक्टोरल कॉलेजच्या प्रमाणिकरणावर चर्चा सुरु असतानाच ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये घुसून धुडगूस घातला होता आणि तोडफोड केली होती. हिंसाचाराच्या या अभूतपूर्व परिस्थितीनंतर अमेरिकी काँग्रेसने ट्रम्प यांना अमेरिकेच्या राज्यघटनेतील २५ व्या घटना दुरुस्तीनुसार पदावरून हटवण्याची किंवा त्यांच्यावर महाभियोग आणण्याबाबत चर्चा केल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आपली भूमिका मांडली आहे.

हिंसाचार आणि अराजकता माजवल्यामुळे प्रत्येक अमेरिकी नागरिकांप्रमाणे मी देखील संतापलो आहे. त्यामुळे संसद भवन सुरक्षित करण्यासाठी आणि अराजकता माजवणाऱ्यांना हटवण्यासाठी मी तातडीने नॅशनल गार्ड आणि फेडरल लॉ इन्फोर्समेंटला पाचारण केले. अमेरिका हे नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचे राष्ट्र असायला हवे, असे ट्रम्प यांनी एक व्हिडीओ जारी करून म्हटले आहे.

जवळपास अडीच मिनिटांच्या या व्हिडीओ संदेशात ट्रम्प यांनी अनेक बाबींचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र हिंसाचार भडकावण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल त्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही. ट्रम्प यांच्या कथित चिथावणीखोर भाषणानंतरच त्यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये हिंसाचार घडवल्याचे आरोप केले जात आहेत. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी हा हिंसाचार घडवणाऱ्यांना देशभक्त संबोधले होते.

या व्हिडीओ संदेशात ट्रम्प यांनी अमेरिकी लोकशाही, देशभक्ती यासारख्या शब्दांचा वापर केला आहे. त्यांनी ही जखम भरून काढण्याची आणि सामोपचाराने राहण्याच्या मुद्यावरही भर दिला. आता अमेरिकी काँग्रेसने निवडणुकीचे निकाल प्रमाणित केले आहेत. त्यामुळे २० जानेवारीला नवीन प्रशासनालाची सुरुवात होईल. आता आपले लक्ष सुव्यवस्थित व निर्धोक सत्तेच्या हस्तांतरणावर असेल, असेही ट्रम्प म्हणाले.

अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांची एक सभा घेतली होती. या सभेत बोलताना ट्रम्प यांनी आम्ही कधीही पराभव मान्य करणार नाही असे सांगतानाच तुम्ही कमजोरीने देश पुन्हा प्राप्त करू शकत नाही, असे ट्रम्प म्हणाले होते आणि त्यांनीच आपल्या समर्थकांना कॅपिटॉल बिल्डिंगकडे मोर्चा वळवण्यासाठी चिथावणी दिली होती.

ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर मिट रोमनी यांनी कॅपिटॉल बिल्डिंगमधील हिंसाचाराला ट्रम्प जबाबदार असल्याचा आरोप केला होता. कॅपिटॉल बिल्डिंगमधील हिंसाचार हा एका स्वार्थी व्यक्तीचा दुखावलेला अहंकार आणि त्याच्या समर्थकांच्या आक्रोशाचा परिपाक आहे. ट्रम्प यांनी मागील दोन महिन्यांपासून आपल्या समर्थकांना जाणूनबुजून चुकीची माहिती दिली होती, असे रोमनी यांनी म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा