योगी आदित्यनाथ सरकारचे १८ मंत्री राजीनामे देणार, ‘या’ नेत्याच्या दाव्याने भाजपच्या पोटात गोळा

0
260
संग्रहित छायाचित्र.

लखनऊः उत्तर प्रदेशात पुन्हा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपचेच सरकार येणार, असे अंदाज बहुतेक जनमत चाचण्यांच्या निष्कर्षात व्यक्त केले जात असतानाच उत्तर प्रदेशात भाजपला अनपेक्षित धक्के बसत आहेत. गेल्या दोन दिवसांत योगी आदित्यनाथ सरकारमधील दोन मंत्री आणि तीन आमदारांनी भाजपला जय श्रीराम ठोकल्यानंतर भाजपकडून डॅमेज कंट्रोलसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच योगी आदित्यनाथ सरकारमधील किमान १८ मंत्री राजीनामे देतील, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भाजपच्या पोटात गोळा उठला आहे.

योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि उत्तर प्रदेशातील वजनदार ओबीसी नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या तीन समर्थक आमदारांनीही राजीनामे दिले, मौर्य यांच्या राजीनाम्यामुळे बसलेल्या धक्क्यातून भाजप सावरत नाही तोच बुधवारी दारासिंह चौहान यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या राजकीय भूकंपामुळे भाजपमध्ये खळबळ माजली असतानाच ओमप्रकाश राजभर यांनी आणखी एक दावा करून उत्तर प्रदेशच्या राजकारणात बॉम्बगोळा टाकला आहे.

सगळ्या गोष्टी ठरल्यानुसार होत आहेत. एकदोन नाही तर दीड डझन मंत्री राजीनामे देणार आहेत आणि भाजपची साथ सोडून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मी हे सांगत आलो आहे. त्याची सुरूवात आता झाली आहे, असे राजभर म्हणाले.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

१४ जानेवारीपर्यंत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहेत. राज्यपालांकडे राजीनाम्यासाठी रांग लागणार आहे. २० जानेवारीपर्यंत एकूण १८ मंत्री राजीनामे देतील, असा दावाच राजभर यांनी केला आहे. स्वामीप्रसाद मौर्य हे मोठे नेते आहेत. समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांनी एखादी भूमिका घेतली की समाज त्यांच्या मागे उभा राहतो. गेल्या निवडणुकीत ते भाजपसोबत गेले आणि भाजपला ओबीसींची साथ मिळाली. आताही ते जी भूमिका घेतील, त्यालाही समाजाची साथ निश्चितच मिळेल, असे सांगत राजभर यांनी मौर्य यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

उत्तर प्रदेशात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. बहुजन समाज पार्टी बेदखल आहे आणि भाजपला येथून निरोप देण्याचा निश्चय जनतेने केला आहे. म्हणजे वारे कोणत्या दिशेने वहात आहे, हे तुम्हीच ओळखा, असे सांगत राजभर यांनी आगामी निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि मित्रपक्षांचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. या निवडणुकीत भाजप ५० जागांच्या पुढे जाऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

निषाद पार्टी भाजपसोबतः ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशातील ओबीसी नेते पक्ष सोडून जात असल्यामुळे संकटात सापडलेल्या भाजपला थोडासा दिलासा मिळाला आहे. निषाद पार्टीचे नेते संजय निषाद यांनी भाजपसोबत युती कायम ठेवण्याचा विश्वास दिला आहे. भाजप नेतृत्वाने निषाद यांना तातडीने दिल्लीला बोलावून युती कायम ठेवण्याचा शब्द मागितला. त्यांनी त्यास होकार दिला आहे. निषाद पार्टीचे नेतेही समाजवादी पक्षात जाऊ शकतात, अशी कालपासून चर्चा होती. स्वामीप्रसाद मौर्य आणि अन्य ओबीसी नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार निषाद पार्टीचे अध्यक्ष संजय निषाद यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आले. अमित शाह यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य धर्मेंद्र प्रधान, सुनील बन्सल, योगी आदित्यनाथ यांनी निषाद यांच्याशी अनेक तास चर्चा केली. आम्हाला दीड झडन जागा देण्याचा शब्द भाजपने दिला आहे. जागांची घोषणा दोन-तीन दिवसांत होईल, असे निषाद यांनी या बैठकीनंतर सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा