योगींच्या हातून कॅच सुटला… भाजपचे दोन मंत्री, सहा आमदार समाजवादी पक्षात!

0
22
छायाचित्र सौजन्यः twitter/@samajwadiparty

लखनऊः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण चांगलेच तापले असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार हादरा देणारे ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज, शुक्रवारी लखनऊमध्ये जोरदार प्रदर्शन केले. मौर्य आणि धर्मसिंह सैनी या भाजपमधील दोन मंत्र्यांसह भाजपला जय श्रीराम ठोकणाऱ्या अन्य सहा आमदारांनी आज अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला.

 मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात भाजपला एकानंतर एक धक्के बसत आहेत. हे धक्के देणारे अनेक भाजप नेते शुक्रवारी समाजवादी पक्षात सामील झाले. माजी कॅबिनेट मंत्री स्वामीप्रसाद मौर्य, माजी कॅबिनेट मंत्री धर्मसिंह सैनी आणि आमदार रोशनलाल शर्मा, बृजेश प्रजापती, मुकेश वर्मा, विनय शाक्य आणि भगवती सागर हे नेते शुक्रवारी समाजवादी पक्षाच्या सायकलवर स्वार झाले. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारमध्ये मागास, दलित, तरूणांची उपेक्षा होत होती आणि आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते, असा या सर्वच नेत्यांचा आरोप आहे.

उत्तर प्रदेशात भाजपच्या विरोधात जनआक्रोश बाहेर पडत आहे. भाजप ८० आणि २० चा नारा देत आहे. परंतु हा त्यांचा गैरसमज असून ८० विरुद्ध २० ची लढाई नसून आता १५ विरुद्ध ८५ अशी लढाई होईल. आम्ही तर ८५ आहोत. उरलेल्या १५ मध्येही अनेक वाटेकरी आहेत, असे मौर्य म्हणाले. तुम्ही हिंदूच्या बाता मारता पण दलितांचे आरक्षण अजगरासारखे गिळून टाकण्याचे पाप तुम्ही का केले? असा सवालही मौर्य यांनी केला.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

उत्तर प्रदेशचे पुढचे मुख्यमंत्री अखिलेश यादवच असतील आणि २०२४ मध्ये ते देशाचे प्रधानमंत्रीही होतील, असा विश्वास मौर्य यांनी यावेळी व्यक्त केला. स्वामीप्रसाद मौर्य यांनी बसप प्रमुख मायावती यांच्यावरही टिकास्त्र सोडले. मायावती या कांशीराम यांच्या मिशनपासन दूर गेल्या आहेत, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशात भाजपच्या विकेटवर विकेट पडत आहेत. अंतिम सामना सुरू झाला आहे. ही आत्मसन्मानाची लढाई आहे. जनतेला परिवर्तन हवे आहे आणि ते आता कुणीही रोखू शकणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.

 योगीबाबांना क्रिकेट खेळता येत नाही. त्यांच्या हातून कॅच सुटला आहे. आता त्यांचा पराभव अटळ आहे. खरेतर येत्या ११ मार्चचेच त्यांचे तिकिट होते. मात्र लखनऊमधील वारे पाहून ते आजच गोरखपूरला निघून गेले आहेत, असा टोलाही अखिलेश यादव यांनी मारला.

सत्ताधारी तीन चतुर्थांश जागा मिळतील असे दावे करत असले तरी तीन ते चार जागा असा त्याचा अर्थ काढावा, असे म्हणत समाजवादी पक्षाच्या मोठ्या विजयाचा दावा त्यांनी केला. समाजवादी पक्षाच्या नेतृत्वातील युतीला उत्तर प्रदेशात ४०० जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. गरिबांचे पोट कापून श्रीमंतांची तिजोरी भरण्याचे काम भाजप करत आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

 दारासिंह चौहानही सपाच्या वाटेवरः योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडलेले दारासिंह चौहानही मौर्य यांच्यासोबतच समाजवादी पक्षात प्रवेश करणार होते. परंतु त्यांनी आज प्रवेश केला नाही. ते १६ फेब्रुवारीला समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत.

भाजपमध्ये घबराटः दरम्यान, उत्तर प्रदेशात धडाधड नेते पक्ष सोडून जात असल्यामुळे भाजपमध्ये भीतीचे वातावरण आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षाच्या सर्वच बड्या नेत्यांवर नाराज आमदारांची मनधरणी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. परंतु त्या नेत्यांनाही त्यात यश येताना दिसत नाही. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वतःच्या बळावर ३१२ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी मंत्री आणि आमदार धडाधड राजीनामे देऊ लागल्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व प्रचंड हैराण झाले आहे.

 योगींनी घेतले दलिताच्या घरी भोजनः उत्तर प्रदेशातील ओबीसीचे मंत्री आणि आमदार भाजपला सोडचिठ्ठी देऊन धडाधड बाहेर पडत असतानाच शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये दलित कुटुंबाच्या घरी जाऊन जेवण घेतले. मागील काही दिवसांपासून ज्या  मंत्री आणि आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे, त्यांनी भाजपकडून दलित व मागासवर्गाची उपेक्षा केली जात असल्याचा आरोप केला आहे. त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी योगींनी दलित कुटुंबाच्या घरी जाऊन जेवण घेतले आणि आपले सरकार दलित समाजासोबत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशात दलित समुदायाची लोकसंख्या २२ टक्के आहे. सरकार आणण्यात आणि पाडण्यात ही लोकसंख्या मोठी भूमिका बजावत असते. मागासवर्गातील नेते पक्ष सोडून जात असल्यामुळे संकटात सापडलेल्या भाजपला योगी आदित्यनाथांनी दलिताघरी घेतलेले भोजपन कितपत संकटमोचक ठरू शकते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा