अंगणवाडी सहायिकेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, गुप्तांगात टाकला रॉड; पुजाऱ्यावर गुन्हा

0
775
प्रतिकात्मक छायाचित्र.

बदायूः उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात निर्भया सामूहिक बलात्कारासारखीच निर्घृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका ५० वर्षीय अंगणवाडी सहायिकेवर मंदिरातच सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. नराधम तिच्यावर सामूहिक बलात्कार करूनच थांबले नाहीत तर त्यांनी तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घुसवला. अंगणवाडी सहायिकेला जबर मारहाणही करण्यात आली. त्यामुळे तिच्या शरीरावर गंभीर जखमाही आढळून आल्या आहेत.

रविवार, ३ जानेवारी रोजी सायंकाळी ही ५० वर्षीय अंगणवाडी सहायिका मंदिरात पूजा करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथे उपस्थित असलेला मंहत सत्यनारायण, चेला वेदराम व ड्रायव्हर जसपाल यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिचा रक्तबंबाळ मृतदेह तिच्या घराबाहेर फेकून देऊन फरार झाले.

हेही वाचाः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या गावातच भाजपची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी!

अंगणवाडी सहायिकेच्या कुटुंबियांनी उघैती पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. परंतु पोलिसांनी कुटुंबियांचीच दिशाभूल करत पोलिस ठाण्याच्या चकरा मारायला लावल्या. पोलिसांनी आधी तर अंगणवाडी सहायिकेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या झाल्याची घटनाच खोटी असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला. विहिरीत पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे पोलिस सांगत राहिले.

मीडियामध्ये या घटनेचा भंडाफोड झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर पोलिसांनी अंगणवाडी सहायिकेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून महंत सत्यनारायण, चेला वेदराम आणि ड्रायव्हर जसपालविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि खूनाचा गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी सोमवार, ४ जानेवारी रोजी महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करता ५ जानेवारी रोजी तब्बल ४८ तासांनंतर शवविच्छेदन केले.

हेही वाचाः मोदींच्या मतदारसंघातच लसीकरणाच्या तयारीची पोलखोलः सायकलवरून पोहोचली कोरोनाची लस!

शवविच्छेदनात अंगणवाडी सहायिकेवर गुदरलेल्या निर्घृण अत्याचाराचा भंडाफोड झाला. शवविच्छेदन अहवालात महिलेच्या शरीरावर गंभीर स्वरुपाच्या जखमांच्या खुणा आढळून आल्या. शिवाय तिच्या गुप्तांगात रॉडसारखी वस्तू घुसवल्याचा प्रकारही समोर आला. त्यामुळे आतला भाग फाटल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. दोन आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत. एसएसपी संकल्प शर्मा यांनी बेजबाबदार पोलिस निरीक्षक राघवेंद्र प्रतापला निलंबित केले आहे.

अंगणवाडी सहायिकेच्या शवविच्छेदन अहवालात अंगणवाडी सहायिकेवर केवळ सामूहिक बलात्कारच नव्हे तर तिच्या गुप्तांगात रॉडसारखी वस्तू घुसवल्याची पुष्टी झाली आहे. तिच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणाही आढळून आल्या आहेत. तिच्या फासळ्याही तुटल्याचे आढळून आले आहे. आरोपींनी महिलेचा एक पाय आणि फासळीही तोडली. तिच्या शरीरातील सर्व रक्त वाहून गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

हेही वाचाः कोरोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते का?, डीसीजीआयने दिले असे स्पष्टीकरण…

३ जानेवारी रोजी ही सामूहिक बलात्कारानंतर हत्येची गंभीर घटना घडूनही पोलिसांनी एवढा बेजबाबदारपणा का दाखवला? कुटुंबियांच्या तक्रारीवरून तत्काळ गुन्हा दाखल करून शवविच्छेदन का केले नाही? असे सवाल आता उपस्थित केले जात असून पोलिस महंताला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप केला जाऊ लागला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावले जाऊ लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा