मोदींच्या मतदारसंघातच लसीकरणाच्या तयारीची पोलखोलः सायकलवरून पोहोचली कोरोनाची लस!

0
179
छायाचित्रः सोशल मीडियावरून साभार

वाराणसीः भारतामध्ये कोरोनावरील दोन लसींना मंजुरी देण्यात आल्यानंतर आम्ही दहा दिवसांत प्रत्यक्ष लसीकरण करण्यास सज्ज आहोत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कालच जाहीर केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून धक्कादायक बातमी आली आहे. प्रत्यक्ष लसीकरणात कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात येत आहे. मात्र या ड्राय रनमध्येच वाराणसीमध्ये लसीकरणाच्या तयारीची पोलखोल झाली आहे. मंगळवारी झालेल्या ड्राय रनमध्ये आरोग्यसेवा कर्मचारी चक्क सायकलवरच लसीचे चार बॉक्स घेऊन शासकीय महिला रुग्णालयात पोहोचला. त्यामुळे लसीकरणाच्या तयारीबाबत सरकारकडून करण्यात आलेल्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंगळवारी उत्तर प्रदेशात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला. या ड्राय रनमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील सहा केंद्रांचा समावेश होता. या ड्राय रनमध्ये चौका घाट येथील शासकीय रुग्णालयातील लस साठवणूक केंद्रातून लसीचे चार बॉक्स घेऊन आरोग्यसेवा कर्मचारी सायकलवरूनच कबीर चौरा येथील शासकीय महिला रुग्णालयात पोहोचला.

हेही वाचाः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या गावातच भाजपची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी!

 जेव्हा हा आरोग्यसेवा कर्मचारी सायकलवरून लसीचे चार बॉक्सेस घेऊन कबीर चौराच्या शासकीय महिला रुग्णालयात पोहोचला तेव्हा तेथे लसीकरणाची कोणतीही तयारी करण्यात आलेली नव्हती. उलट तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने या आरोग्यसेवा कर्मचाऱ्याला रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावरच रोखले आणि त्याला रुग्णालयात प्रवेश करण्यास मज्जाव केला.

हेही वाचाः कोरोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते का?, डीसीजीआयने दिले असे स्पष्टीकरण…

आपण चौकाघाट येथील शासकीय रुग्णालयातील लस साठवणूक केंद्रातून कोरोना लसीचे डम्मी बॉक्सेस घेऊन आलो आहोत, असे जेव्हा या आरोग्यसेवा कर्मचाऱ्याने सांगितले, तेव्हा मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आणि नंतर त्यांनी ड्राय रनची तयारी केली.

छायाचित्र सौजन्यः हिंदुस्तान टाइम्स

लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये लस साठवणूक केंद्रातून लसीकरण केंद्रापर्यंत लस कशी पोहोचवली जावी, त्यासाठी काय खबरदारी घ्यावी, कोरोनाची लस लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत योग्य तापमानात राहील याची कशी खबरदारी घ्यावी, अशा सगळ्याच गोष्टींचा सराव अपेक्षित होता. मात्र वाराणसीत याच्या नेमके उलटेच घडले. योग्य तापमानाची खबरदारी न घेताच सायकलवरूनच लसीकरण केंद्रावर लसीचे बॉक्स पाठवण्यात आल्यामुळे सरकारच्या लसीकरणाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचाः राज्यातील सर्व जिल्ह्यात शुक्रवारी ड्राय रन, १४ जानेवारीपर्यंत लसीकरणही सुरू होण्याचे संकेत

 मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. बी. सिंग यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून कोल्ड चेनची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी याबाबत लेखी स्पष्टीकरण मागवले आहे. शासकीय महिला रुग्णालयात लस साठवणुकीची तयारी आधीच करण्यात आलेली आहे. चौकाघाट येथील शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या २५ हजार लसी साठवून ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे, असेही डॉ. सिंग म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी संपूर्ण राज्यात ड्राय रन घेण्याचे आदेश दिले होते. देशातील हा सर्वात मोठा ड्राय रन असल्याचेही योगी आदित्यनाथ म्हणाले होते. मात्र या ड्राय रनमध्ये लसीकरणाचे कोणतेही नियोजन नसल्याचे उघड झाले आहे. अनेक लसीकरण केंद्रांवर स्वयंसेवकच नव्हते. एका लसीकरण केंद्रावर २५ जणांच्या लसीकरणाचा सराव घेण्याचे ठरवण्यात आले होते मात्र अनेक ठिकाणी केवळ दोनच जण लस टोचून घेण्यासाठी पोहोचल्याचेही निदर्शनास आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा