वंचित बहुजन आघाडीच्या अहमदनगरमधील उमेदवाराचा हटके वचननामा : गुंडगिरी करणार नाही, खंडणी मागणार नाही अशी दिली २१ वचने

0
964

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीतील लक्षणीय कामगिरीमुळे चर्चेत आलेली वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत काय कामगिरी करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना वंचित बहुजन आघाडीच्या अहमदनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किरण काळे यांनी प्रसिद्ध केलेला वैयक्तिक वचननामा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मी गुंडगिरी करणार नाही, मी कोणाचे खून करणार नाही आणि राजकीय स्वार्थासाठी जातीय दंगली भडकवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार नाही, अशा अनेक हटके बाबींचे वचन किरण काळे यांनी आपल्या वचननाम्यात दिले आहे.

 राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी टिपेला पोहोचत आहे. सत्ताधारी भाजप- शिवसेना आणि विरोधकांत आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार किरण काळे यांनी हा हटके वचननामा प्रसिद्ध केला आहे. काळे यांच्या विरोधात शिवसेनेचे अनिल राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप हे उमेदवार रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीने स्वतःचा राज्यासाठीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला असतानाही किरण काळे यांनी स्वतःचा वचननामा प्रसिद्ध केला आहे. त्यात कोणत्याही सवंग आश्‍वासनांचा उल्लेख नाही. मात्र, त्यातून त्यांनी निवडणुकीच्या मैदानातील उमेदवारांची राजकीय कुंडली मांडण्याचा प्रयत्न केला आहे. किरण काळे यांच्या वचननाम्यात एकूण 21 वचनांचा समावेश आहे. ती अशीः

 • मी कधीही सत्तेसाठी धर्माचे बेगडी प्रेम दाखवत धर्माच्या नावाखाली राजकीय पोळी भाजणार नाही.
 • मी कधीही कुणाची कष्टाची प्रॉपर्टी बळकावणार नाही.
 • मी गुंडगिरी करणार नाही.
 • मी कधीही पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार नाही.
 • मी कुणाचेही खून करणार नाही.
 • मी कुठल्याही अधिकाऱ्याला चप्पल फेकून मारणार नाही.
 • मी पत्रकारांना मारहाण करून दहशत माजवणार नाही.
 • मी अहमदनगरमधील व्यापाऱ्यांना धमकावणार नाही.
 • मी कधीही भावनिक राजकारण करणार नाही.
 • मी प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव टाकून भ्रष्टाचार करणार नाही.
 • राजकीय स्वार्थासाठी जातीय दंगली भडकवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार नाही.
 • मी एमआयडीसीतील उद्योजकांकडे खंडणी मागून त्यांना वेठीस धरणार नाही.
 • मी कधीही शहरातील तरूणांना गुन्हेगारी विश्वात ढकलून त्यांचे आयुष्य बर्बाद करणार नाही.
 • मी कधीही स्वतः आणि माझ्या सहकाऱ्यांमार्फत नगरकरांवर अन्याय आणि त्यांचे शोषण करणार नाही.
 • मी कधीही सेटलमेंटचे राजकारण करून नगरकरांशी प्रतारणा करणार नाही.
 • मी कधीही उद्योजकांना मारहाण करून शहरातून कंपन्यांना पळवून लावत नगरकरांचा रोजगार हिरावून घेणार नाही.
 • मी कधीही सत्तालालसेपोटी मनपा निवडणुकीत अभद्र युती करून मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही.

 अशी वचने किरण काळे यांनी दिली आहेत. किरण काळे यांचा हा वचननामा लक्षात घेता अन्य उमेदवारांनीही असाच वैयक्तिक वचनमाना जाहीर करण्याची मागणीही पुढे येऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा