‘जय भीम’ सिनेमा वादात, वन्नियार समुदायाकडून बिनशर्त माफी आणि ५ कोटी रुपयांची मागणी

0
401
जय भीम चित्रपटाचे पोस्टर.

मुंबईः नुकताच प्रदर्शित झालेला आणि चर्चेत आलेला ‘जय भीम’ सिनेमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वन्नियार संगम समुदायाने चित्रपटाचे अभिनेते, निर्माते आणि संपूर्ण टीमला मानहानीची नोटीस बजावली असून एक आठवड्याच्या आत माफी मागून ५ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली आहे.

अभिनेता सूर्या आणि दिग्दर्शक टीजे ग्नानवेल यांचा जयभीम हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात वन्नियार समाजाच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला कलंक लावणारी बदनामीकारक दृश्य जाणीवपूर्वक टाकण्यात आल्याचा आरोप वन्नियार संगम समुदायाच्या प्रदेशाध्यक्षांनी केला असून त्यांनी जय भीमचे अभिनेते सूर्या आणि दिग्दर्शक ग्नानवेल यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली काही दृश्ये वास्तविक घटनेवर आधारित आहेत. मात्र चित्रपटात राजकन्नूचा छळ करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची व्यक्तिरेखा जाणीवपूर्वक वन्नियार जातीशी संबंधित दाखवण्यात आली आहे, असे या कायदेशीर नोटीसीत म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

चित्रपटात वास्तविक घटनेतील वास्तविक व्यक्तिरेखांचे खरी नावे कायम ठेवण्यात आली आहेत. परंतु चित्रपटात जाणीवपूर्वक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव बदलण्यात आले आहे. वास्तविक घटनेत ज्या पोलिस उपनिरीक्षकाच्या कोठडीत कच्चा कैद्याचा मृत्यू झाला आहे, त्याचे खरे नाव एंथनीसामी होते, जो ख्रिश्चन धर्माशी संबंधित होता, असेही या नोटीसीत म्हटले आहे.

या चित्रपटातील पोलिस उपनिरीक्षकाला वन्नियार समुदायाशी संबंधित चित्रित करता यावे म्हणून अग्नीकुंडम प्रतिकासोबत एक कॅलेंडर ठेवण्यात आले, असा आरोपही या नोटीसीत करण्यात आला आहे. वन्नियार समुदायाला बदनाम करणअयासाठी आणि संपूर्ण समुदायाच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्याच्या हेतूने असे करण्यात आल्याचा आरोपही या नोटीसीत करण्यात आला आहे. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य हटवण्यात यावीत आणि एक आठवड्याच्या आत संपूर्ण वन्नियार संगम समुदायाची माफी मागून ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही या नोटीसीत करण्यात आली आहे.

२ नोव्हेंबर रोजी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या जय भीम या चित्रपटात इरूलर या आदिवासी समुदावर पोलिस कोठडीत किती अत्याचार केले जातात आणि त्यांचा कसा छळ केला जातो, हे दर्शवण्यात आले आहे. या आधी या चित्रपटातील एका दृश्यावर हिंदी भाषिक प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. एका दृश्यात अभिनेता प्रकाश राज हिंदी बोलणाऱ्या एका व्यक्तीच्या कानशिलात थापड मारत तामीळ बोलण्यास बजावताना दिसत आहेत. हिंदी भाषिकांनी या दृश्यावर आक्षेप घेत तीव्र नापंसती व्यक्त केली होती. तो वाद शमतो न शमतो तोच आता हा नवा वाद पुढे आला आहे.

अभिनेता सूर्याचे निवेदनः या चित्रपटाचा अभिनेता सूर्या यांनी एक निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या चित्रपट किंवा आपला कोणतीही व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान करण्याचा अजिबात हेतू नाही. सूर्या यांच्या या निवेदनानंतर त्यांच्या चाहत्यांनी ट्विटरवर #WeStandWithSurya हा ट्रेंड चालवला आणि सूर्याला पाठिंबा दर्शवला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा