एनआरसी आणि सीएएचा डाव 40 टक्के हिंदूंच्याही विरोधात, मोदी सरकार पाडाः प्रकाश आंबेडकर

0
83

मुंबईः सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही(एनआरसी) हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) आणि भाजपचा डाव आहे. हा डाव केवळ मुस्लिमांच्या विरोधातच आहे, असे नाही तर देशातील 40 टक्के हिंदूंच्याही विरोधात हा डाव आहे. आजही देशातील अनेक लोकांचे संसार गाढवाच्या पाठीवर आहेत. त्यांच्याकडे कसलेही पुरावे नाहीत. बाप कुठे मेला, आजोबा कुठे मेला हेही अनेकांना माहीत नाही. त्यांच्याकडे नागरिकत्वाचे पुरावे मागितले जाणार, हा अन्याय आहे. आरएसएस-भाजपने विचारपूर्वक केलेल्या कायद्याला संघर्षानेच उत्तर द्यायला हवे. भाजपकडून देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न होत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

 वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सीएए आणि एनआरसीच्या विरोधात मुंबईतील दादरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध समाजाचे लोक सहभागी झाले होते. एनआरसी- सीएएच्या विरोधात हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्रित लढा द्यायला हवा. डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचे नसेल तर मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवा. हे सरकार पाडा, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

डिटेन्शन कॅम्पची योजना ब्रिटिशांचीः मोदी सरकारने आणलेली डिटेन्शन कॅम्पची पद्धत ही ब्रिटिशांनी आणलेली पद्धत आहे. ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमात कायदा केला होता. या कायद्याने ज्या जमातींना गुन्हेगार ठरवण्यात आले होते, त्या जमातींना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. या देशात त्यांना शिक्षणाची दारे बंद केली होती. या जमातींकडे जमिनी नव्हत्या. त्यामुळे त्या जमातींच्या अलिकडच्या पिढीकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. एनआरसी या जमातींच्या लोकांच्या विरोधात आहे. तुम्हाला डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचे नसेल तर विरोधात आवाज उठवा आणि हे सरकार पाडा, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी देशातील जनतेला केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा