पीएम केअर व्हेंटिलेटर्सची पोलखोलः आधी लेखी दिले सर्वच वापरात, प्रत्यक्षात आढळले सर्वच खराब

0
191
पीएम केअर फंडातून हिंगोली जिल्हा रुग्णालयाला पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सची पाहणी करताना आ. सतीश चव्हाण.

औरंगाबादः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘महत्वाकांक्षी’ पीएम केअर फंडातून औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेल्या निकृष्ट आणि नादुरूस्त व्हेंटिलेटर्सचा मुद्दा गाजत असतानाच आणि भाजपकडून या सर्वच प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होत असताना आज या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. औरंगाबादला मिळालेल्या १०० व्हेंटिलेटर्समधून हिंगोलीला पाठवण्यात आलेल्या १५ व्हेंटिलेटर्सपैकी सर्वच्या सर्वच व्हेंटिलेटर्स निरुपयोगी आणि नादुरूस्त असल्याचे उघडकीस आले आहे.

पीएम केअर फंडातून औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटीला ज्योती सीएनसी कंपनीचे धमण-३ मॉडेलचे १०० व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते. हे व्हेंटिलेटर्स नादुरूस्त असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणावरून राज्यातील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि विरोधी पक्षात असलेला भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांकडून व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचे आणि निरुपयोगी असल्याचा आरोप झाल्यानंतर भाजपने मात्र ९० टक्के व्हेंटिलेटर्स चांगले व चालू स्थितीत असल्याचा दावा केला होता. आता भाजपच्या याच दाव्याची पोलखोल झाली आहे.

पीएम केअर फंडातील निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटर्सचा मुद्दा गाजत असतानाच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी हिंगोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना १९ मे रोजी एक पत्र लिहून औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून पुरवण्यात आलेल्या १५ व्हेंटिलेटर्सचा तपशील मागवला होता. हिंगोली जिल्ह्याला किती व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले? त्यापैकी किती व्हेंटिलेटर्स वापरात आहेत? किती व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत आहेत? बंद अवस्थेत असतील तर या संदर्भात आपण वरिष्ठ विभागाला कळवले आहे का? आदी तपशीलाची मागणी आ. चव्हाण यांनी या पत्रात केली होती.

आ. चव्हाणांच्या पत्राच्या उत्तरादाखल हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी गुरूवार २० मे रोजी लेखी उत्तर दिले. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून ज्योती सीएनसी कंपनीचे धमण-३ मॉडेलचे एकूण १५ व्हेंटिलेटर्स २४ एप्रिल रोजी हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले आहेत. यापैकी सर्व १५ व्हेंटिलेटर्स वापरात आहेत. सद्यस्थितीत यापैकी कोणतेही व्हेंटिलेटर बंद अवस्थेत नाही. सद्यस्थितीत व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत नसल्यामुळे वरिष्ठ विभागाला कळवण्यात आले नाही, असे डॉ. सूर्यवंशी यांनी या पत्रात नमूद केले होते.

 जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यवंशी यांचे हे पत्र प्राप्त झाल्यानंतर आमदार सतीश चव्हाण यांनी हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयाला आजच (२० मे) अचानक भेट दिली आणि व्हेंटिलेटर्सची प्रत्यक्ष पाहणी केली असता डॉ. सूर्यवंशी यांनी लेखी कळवलेली माहिती सपशेल खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहेत.

पीएम केअर फंडातून हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयाला पुरवण्यात आलेल्या १५ व्हेंटिलेटर्सपैकी २ व्हेंटिलेटर्स सुरू होत नाहीत. उर्वरित १३ व्हेंटिलेटर्स पुरेशा दाबाने ऑक्सीजन पुरवठा देऊन कार्यान्वित केले असता त्यामध्ये ‘एअर अँड ऑक्सीजन सप्लाय फेल्ड’ असा मेसेज स्क्रीनवर येतो. सर्व व्हेंटिलेटर्सला पुरेसा बॅटरी बॅकअपही नाही. यापैकी दोन व्हेंटिलेटर्स बायपॅप मोडवर वापरले असता त्यास अन्य स्रोतांने अतिरिक्त ऑक्सीजन पुरवठा द्यावा लागतो, असे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे. प्रत्यक्ष पाहणीत पोलखोल झाल्यानंतर डॉ. सूर्यवंशी यांनी आमदार चव्हाण यांना व्हेंटिलेटर्सची खरीखुरी अवस्था नमूद करणारे लेखी पत्रही दिले आहे.

डॉ. सूर्यवंशी भाजपचे हस्तक आहेत का?: पीएम केअर फंडातून पुरवठा करण्यात आलेले व्हेंटिलेटर्स वापरण्यायोग्य नसल्याचे माहीत असूनही ते सुस्थितीत असल्याचे सांगण्याचा अट्टाहास जिल्हा शल्य चिकित्सकासारख्या वरिष्ठ पदावर बसलेल्या व्यक्तींकडून का केला जातो?  राज्य सरकारच्या आरोग्य सेवेत असलेले डॉ. सूर्यवंशी हे भाजपचे हस्तक म्हणून काम करत आहेत का? नसतील तर त्यांनी आ. चव्हाणांसारख्या लोकप्रतिनिधींनाही लेखी स्वरुपात धादांत खोटी माहिती का दिली? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. वापरायोग्य नसलेले हे व्हेंटिलेटर्स वापरासाठी आरोग्य यंत्रणेवर कुणाचा दबाव आहे का?  असेल तर राज्य सरकारने तत्काळ दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली आहे.

हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी आधी आ. सतीश चव्हाणांना दिलेले लेखी पत्र.
आ. सतीश चव्हाण यांनी अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पाहणीत व्हेंटिलेटर्सची जी अवस्था आढळली, ती मान्य करून वस्तुस्थिती दर्शक लेखी पत्र डॉ. सूर्यवंशी यांनी दिले. अधिकारी लोकप्रतिनिधींच्याच डोक्यात अशी धुळफेक करत असतील तर सर्वसामान्यांचे काय?

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा