पद्मश्री फातेमा झकेरिया यांचे निधन, शिक्षण क्षेत्रातील वंचितांचा आधार काळाच्या पडद्याआड!

0
175
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा पद्मश्री फातेमा रफिक झकेरिया यांचे मंगळवारी वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वीच उपचारासाठी  कमल नयन बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रातील वंचितांचा आधार हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.

 फातेमा झकेरिया यांनी गेली पन्नास वर्षे विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी पत्रकारितेबरोबरच शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातही महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या बहुविध कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री या नागरी सन्मानाने गौरवण्यात आले होते.

फातेमा झकेरिया यांचा जन्म मुंबईत १७ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला होता. त्यांनी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कमधून शिक्षण घेतले होते. समाजकार्य विषयात घेतलेल्या आपल्या शिक्षणाचा समाजासाठी उपयोग करत त्यांनी १९५८ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चिल्ड्रेन अँड वुमेन या संस्थेद्वारे मुलांची देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी ५०० हून अधिक मुलांचे शिक्षण आणि आरोग्याची काळजी वाहिली होती.

फातेमा झकेरिया यांनी १९७० ते १९८० च्या दशकात ‘द विकली’ या नामांकित साप्ताहिकात महत्वाच्या विविध पदांवर काम केले. त्या मुंबई टाइम्सच्या संपादिका होत्या. टाइम्स ऑफ इंडियाच्या संडे एडिटर, ताज नियतकालिकाच्या संपादिका आदी पदांवरही त्यांनी काम केले होते. त्या काळात त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, जयप्रकाश नारायण, जेआरडी टाटा, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, चरणसिंग अशा मोठ्या नेत्यांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या.

फातेमा झकेरिया या उत्तम भाषांतरकारही होत्या. त्यांनी डॉ. झाकीर हुसेन, कृष्ण चंदर अशा प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचे उर्दूतून इंग्रजीत भाषांतर केले आहे. पत्रकारितेतील त्यांच्या  योगदानाची दखल घेत त्यांना १९८३ मध्ये सरोजिनी नाडयू एकत्रिकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  फातेमा झकेरिया या केंद्र सरकारने माध्यमांची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या सदस्याही होत्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा