अटक तर त्यांचा बापही करू शकत नाही… बाबा रामदेव यांचे आव्हान, आयएमए ठोकणार दावा!

0
400
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेली काही दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकलेले योगगुरू बाबा रामदेव यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात ते अटक तर त्यांचा बाप करू शकत नाही… असे म्हणत त्यांनी कायद्यालाच खुले आव्हान दिले असून त्यावरून बाबा रामदेव यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. दरम्यान, डॉक्टर आणि ऍलोपॅथीबाबत केलेल्या विधानांबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना १ हजार कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस बजावली आहे.

ऍलोपॅथी आणि डॉक्टरांबद्दल बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटलेला असतानाच रामदेव यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत काहीच माहिती मिळत नाही, मात्र नेटकऱ्यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत रामदेव यांना लक्ष्य केले आहे.

कधी कधी लोक सोशल मीडियावर स्वामी रामदेव यांना अटक करण्याचा ट्रेंड चालवतात. अटक तर त्यांचा बापही करू शकत नाही स्वामी रामदेव यांना. रामदेव यांना तत्काळ अटक करा, असा ट्रेंड चालवतात. तर कधी ठग रामदेव, महाठग रामदेव असा ट्रेंड चालवतात. चाल द्या. तुम्हा लोकांनाही आता ट्रेंड चालवण्याचा सराव झाला आहे. आणि तो ट्रेंड टॉपवर असतो, असे रामदेव या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

रामदेव यांच्या या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. बाबा रामदेव हे भाजप आणि प्रधानमंत्री मोदी यांच्या जवळचे असल्यामुळे असे बोलत आहेत, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. अटक तर त्यांचा बाप करू शकत नाही… हे कायद्याला खुले आव्हान देत आहेत. सरकार कोणाच्या बाजूने आहे, हे त्यांनी सांगावे, अशी विचारणाही होऊ लागली आहे.

आयएमए दाखल करणार १ हजार कोटींचा दावाः दरम्यान, ऍलोपॅथी आणि डॉक्टरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संतप्त झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) उत्तराखंड शाखेने बाबा रामदेव यांना १ हजार कोटीच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस बजावली आहे. येत्या १५ दिवसांत रामदेव यांनी लेखी माफी मागावी सचे व्हायरल झालेल्या वक्तव्याबद्दल प्रतिवाद करणारा व्हिडीओ पोस्ट करावा, अशी मागणी आयएमएने केली आहे. रामदेव यांनी माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात १ हजार कोटींचा दावा दाखल केला जाईल, असे आयएमएने नोटिसीत म्हटले आहे.

आयएमएचे उत्तराखंड शाखेचे प्रदेश सचिव डॉ. अजय खन्ना यांनी सहा पानांची ही नोटीस बजावली आहे. रामदेव यांच्या वक्तव्यामुळे उत्तराखंडमधील आयएमएशी संबंधित दोन हजार सदस्यांची मानहानी झाली आहे. एका डॉक्टर सदस्याच्या मानहानीसाठी ५० लाख यानुसार १ हजार कोटींचा दावा दाखल केला जाईल, असे या नोटिसीत म्हटले आहे.

कोरोनिलच्या जाहिराती मागे घ्याः आयएमएने बाबा रामदेव यांना ७६ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. कोरोनावर रामबाण उपाय म्हणून प्रचार केल्या जाणाऱ्या कोरोनिलच्या सगळ्या भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिराती सगळ्या प्लॅटफार्मवरून ७६ तासांत हटवण्यात याव्यात, अशी मागणीही आयएमएने या नोटिसीत केली आहे. रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आणि कारवाईसाठी आयएमए लवकरच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा