‘कोर्ट’ बंद पडलेः विद्रोही विचारवंत, अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन

0
161

नागपूरः विद्रोही विचारवंत, लेखक आणि अभिनेते वीरा साथीदार यांचे सोमवारी मध्यरात्री कोरनाच्या संसर्गाने निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची भूमिका असलेला ‘कोर्ट’ हा सिनेमा प्रचंड गाजला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. ऑस्करसाठी सर्वश्रेष्ठ परदेशी भाषेतील सिनेमासाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले होते.

वर्धा जिल्ह्यातील जोगीनगरमध्ये लहानाचे मोठे झालेले वीरा यांचे वडिल नागपूर रेल्वे स्थानकावर हमाल होते तर त्यांची आई बांधकाम मजूर होती. घरची परिस्थिती हालाखीची असूनही त्यांना त्यांच्या आईने शिकण्याची ताकद दिली.

वीरा साथीदार यांनी विद्रोही मासिकाचे संपादन केले. रिपब्लिन पँथर या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी वंचित समाज घटकांसाठी काम केले. त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिताही केली. पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी वंचित, शोषित, पीडित समाज घटकांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला. त्यांनी लिहिलेली आंबेडकरी चळवळीतील गाणीही गाजली.

कोर्ट चित्रपटात त्यांनी नारायण कांबळेची मुख्य भूमिका साकारली होती. ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्णकमळ या चित्रपटाने मिळवले होते. चैतन्य ताम्हणे यांनी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

 कोर्ट या चित्रपटात ज्या लोकशाहीरांचा लढा लढवला गेला, त्या लोकशाही नारायण कांबळेची भूमिका करणारे वीरा साथीदार यांचा चित्रपटसृष्टीशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. त्यांचा संबंध योगायोगाने सामाजिक कार्य करणाऱ्या वकिलांशी आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या कोर्टच्या टीमशी आला होता. तेवढ्याच अनुभवावर वीरा साथीदार यांनी नारायण कांबळेंची भूमिका मोठ्या ताकदीने उभी केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा