राज्यातील १४ हजार २३२ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू, एकेक मतासाठी गावपुढाऱ्यांची धावपळ

0
46
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोना संसर्गामुळे लांबवणीवर पडलेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील मुदत संपलेल्या १४ हजार २३२ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. या निवडणुकीची १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र सरपंच आणि सदस्यत्वाच्या लिलावामुळे आयोगाने नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा दोन ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमच रद्द करून टाकला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी राजकीय पक्षांकडून पुरस्कृत पॅनेल निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. राजकीय पक्षांच्या चिन्हावर ही निवडणूक होत नसल्यामुळे कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या, हे अधिकृतपणे सांगता येत नाही, तरीही सर्वच राजकीय पक्षांकडून आम्हालाच सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा केला जातो. खासदारकी आणि आमदारकीसाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात असणे महत्वाचे असल्याने खासदार- आमदारांनी आपापल्या भागातील निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.

शहरांमध्ये कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होऊ लागल्यानंतर नोकरी-धंद्यानिमित्त गाव सोडून शहरात गेलेल्या लोकांचे लोंढे गावाच्या दिशेने निघाले होते. मात्र त्यावेळी गावपुढाऱ्यांनी शहारातून येणाऱ्या लोकांना गावात प्रवेश नाकारला होता. त्यांना सक्तीने १४ दिवस गावाबाहेर राहण्यास भाग पाडले होते. आज हेच पुढारी मतदानासाठी त्याच लोकांचे हातपाय जोडत असल्याचे चित्रही पहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एक एक मतदान महत्वाचे असल्यामुळे शहरातील लोकांना मतदानासाठी येण्यासाठी खास वाहनांची सोयही काही उमेदवारांनी केली आहे.

एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते. परंतु कोरोना संसर्गामुळे १७ मार्च रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णतः रद्द करण्यात आला होता. या ग्रामपंचायतींसोबत डिसेंबरअखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे.

निवडणूक होणाऱ्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशीः

 • औरंगाबादः ६१८
 • नांदेडः १०१५
 • उस्मानाबादः ४२८
 • बीडः १२९
 • परभणीः ५६६
 • जालनाः ४७५
 • लातूरः ४०८
 • हिंगोलीः ४९५
 • बुलडाणाः ५२७
 • चंद्रपूरः ६२९
 • नागपूरः १३०
 • अकोलाः २२५
 • अमरावतीः५५३
 • यवतमाळः ९८०
 • वाशिमः १६३
 • भंडाराः १४८
 • वर्धाः ५०
 • गोंदियाः १८९
 • गडचिरोलीः ३६२
 • जळगावः७८३
 • अहमदनगरः ७६७
 • पुणेः ७४८
 • सोलापूरः६५८
 • साताराः ८७९
 • सांगलीः १५२
 • कोल्हापूरः ४३३
 • नाशिकः ६२०
 • धुळेः१२८
 • ठाणेः १५८
 • रायगडः८८
 • पालघरः ३
 • सिंधुदुर्गः ७०
 • रत्नागिरीः ४७९
 • नंदूरबारः ८६

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा