अनुंकपा तत्त्वावरील भरतीची वेटिंगलिस्ट संपणार, टप्प्याटप्प्याने घेणार सेवेत सामावून!

0
75

मुंबई: अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी पात्र उमेदवारांना न्याय देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने ही भरती जलदगतीने व्हावी तसेच सध्याच्या प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना टप्प्या-टप्प्याने सामावून घेता यावे यासाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. प्रकल्पग्रस्त आरक्षणांतर्गत रिक्त जागांचा अहवाल महिन्याच्या आत सादर करावा अशा सूचनाही भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अनुकंपा तत्त्वावरील भरती तसेच प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या भरतीच्या अनुषंगाने शिष्टमंडळांनी भरणे यांची मंत्रालयात भेट घेतली. आमदार प्रकाश आबीटकर, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी, उपसचिव टिकाराम करपते आदी यावेळी उपस्थित होते.

शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी विविध मागण्या सादर केल्या. रिक्त पदांची अनुपलब्धता किंवा भरतीसाठी कमी उपलब्ध होत असल्याने अनुकंपा तत्त्वावरील भरती बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे. सद्यस्थितीत १० हजारावर उमेदवार अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी प्रतीक्षा यादीत आहेत.

अनुकंपा तत्त्वावरील सर्व उमेदवारांना भरतीमध्ये लवकरात लवकर सामावून घेण्यासाठी सन २००८ मध्ये सलग तीन वर्षात ५० टक्के, २५ टक्के आणि २५ टक्के अशा पद्धतीने सामावून घेण्यासाठी शासन निर्णय झाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा तशा पद्धतीचा शासन निर्णय करून अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यावर उमेदवारांना जलदरितीने सामावून घेण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळापुढे सादर करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, त्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे भरणे यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्तांना समांतर आरक्षणः प्रकल्पग्रस्त उमेदवारांना शासकीय, निमशासकीय सेवेत समांतर आरक्षण असून त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी सर्व विभागातील या घटकासाठीच्या रिक्त जागांची माहिती एक महिन्याच्या कालावधीत सादर करावी. या उमेदवारांना पुढील भरतीमध्ये प्राधान्याने सामावून घेण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल, असेही भरणे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा