मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणात पुढील २४ तास मुसळधार कोसळणार; मुंबईतही जोर वाढला

0
189
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्याच्या काही भागांत काल रात्रीपासून तर काही भागांत आज पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत पुढील तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे पुढील २४ तासांत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

विदर्भाच्या पश्चिमेकडील काही भागावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील २४ तास संततधार पाऊस सुरू राहणार आहे. काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला राज्याच्या बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांत या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील एकूण १६ जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यातही हंगामातील पाऊस सरारीच्या तुलनेत कमी पडला आहे. आता पुढील दोन-तीन दिवस अनेक भागांत पाऊस हजेरी लावणार असल्यामुळे काही ठिकाणी तरी हंगामातील पावसाची सरासरी पूर्ण होण्याची आशा आहे.

 गेल्या २४ तासांत विदर्भातील अनेक ठिकाणी आणि कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून आज ऑरेंज अलर्ट राजी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरड कोसळल्यामुळे औरंगाबाद- सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढला असून चाळीसगाव शहरात महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. चाळीसगावच्या बाजारपेठेत पाणी शिरले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा