अतिवृष्टीचा इशाराः पुढील चार-पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

0
589
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासांत तीव्र होण्याची आणि पश्चिम- वायव्येच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्यामुळे ऐन गणेशोत्सवात पुढील चार-पाच दिवसांत राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक भागात दिसून येईल आणि पुढील चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. राज्यात काही ठिकाणी आजच पुन्हा जोरदार पावसाला सुरूवातही झालेली आहे.

आवश्य वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता १२ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. तो १४ सप्टेंबरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. या काळात कोकण, पश्चिम-मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.

१२ सप्टेंबर रोजी पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर सिंधूदुर्ग,वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

१३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबई, जालना, परभणी, नांदेड, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

१४ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, जळगाव, धुळे, नंदूरबार, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोणत्या रंगाच्या अलर्टचा काय असतो अर्थ?

ऑरेंज अलर्टः हवामान खात्याकडून जेव्हा ऑरेंज अलर्ट दिला जातो. त्याचा अर्थ अतिमुसळधार पावसाचा इशारा असा होतो. ऑरेंज अलर्टच्या काळात २४ तासांत ११५.६ ते २०४.४ मिलीमीटर पावसाची शक्यता असते.

यलो अलर्टः यलो अलर्टचा अर्थ मुसळधार पाऊस असा होतो. २४ तासांत ६४.५ ते ११५.५ मिलीमीटर पावसाची शक्यता असते, तेव्हा हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी केला जातो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा