मराठवाडा, कोकणासह राज्याच्या बहुतांश भागात चार-पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

0
194
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः येत्या ४८ तासांत उत्तर/ उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांत राज्यात बऱ्यास ठिकाणी विजांच्या कडकडाटास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

 पुढील पाच दिवसात कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा सर्वाधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे. या काळात मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद होईल, असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

आज राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल. जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेडबरोबरच मुंबई आणि ठाण्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. बहुतांश ठिकाणी पावसाला सुरूवातही झालेली आहे.

उद्या ५ सप्टेंबरला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर आणि जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

६ सप्टेंबरला मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर, पुणे, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

७ सप्टेंबरला औरंगाबाद, जालना, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अहमदनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोणत्या अलर्टचा काय असतो अर्थ?

ऑरेंज अलर्टः हवामान खात्याकडून जेव्हा ऑरेंज अलर्ट दिला जातो. त्याचा अर्थ अतिमुसळधार पावसाचा इशारा असा होतो. ऑरेंज अलर्टच्या काळात २४ तासांत ११५.६ ते २०४.४ मिलीमीटर पावसाची शक्यता असते.

यलो अलर्टः यलो अलर्टचा अर्थ मुसळधार पाऊस असा होतो. २४ तासांत ६४.५ ते ११५.५ मिलीमीटर पावसाची शक्यता असते, तेव्हा हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी केला जातो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा