महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय, शनिवारपासून राज्यात सर्वदूर वाढणार पावसाचा जोर!

0
218
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येऊ लागल्यामुळे आणि अरबी समुद्रात मोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे आजपासून विदर्भ आणि कोकणात मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. शनिवार, १० जुलैपासून पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

 दरम्यान, येत्या २४ तासांत मराठवाड्याच्या काही भागांसह मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून पुन्हा सक्रीय झाल्यामुळे पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळणार आहे.

आगमनाला पाऊस जोरदार बरसल्यामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या होत्या. परंतु पेरण्या उरकल्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत होते. गेल्या दहा ते बारा दिवासांपासून राज्याच्या अनेक भागात पाऊस क्षीण झाला होता. दोन दिवसांपासून काही तुरळक ठिकाणी मेघधारा बरसल्या खऱ्या, परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प होते. आता पाऊस पुन्हा सक्रीय झाल्यामुळे शेतकरी आनंदून गेला आहे.

अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे ८ किवा ९ जुलैपासून कोकणात पावसाला सुरूवात होईल. मध्य महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव जाणवेल. दुसरीकडे बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून बाष्प जमिनीच्या दिशेने येत आहेत. त्यानंतर बंगालच्या उपसागरात ११ जुलै रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह मध्य भारतात ९ जुलैपासून पाऊस सुरू होईल आणि ११ जुलैपासून त्याचा जोर आणखी वाढेल, अशी माहिती हवामान खात्याच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे माजी महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ९ जुलै रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्य स्वरूपाचा तर काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

१० जुलै रोजी मुंबई आणि ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात काही भागांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे.

११ जुलै रोजी मुंबई, ठाणे, कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पाऊस ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा या दोन जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ११ जुलैपासून मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा