राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

0
122
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली असून १ ते ३ डिसेंबरदरम्यान राज्याच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज सकाळपासून राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. नाशिक, धुळे, नंदूरार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड आदी जिल्ह्यांमध्ये वादळीवारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

मुंबई, पुण्यासह राज्याच्या काही भागात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हवामान खात्याने आज यलो अलर्ट जारी केला आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हवेतील गारवा वाढला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यातील वाऱ्याचा वेगही जास्त राहणार आहे.

औरंगाबादसह मराठवाड्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या कापूस वेचणी सुरू आहे. अशा स्थितीत पाऊस झाला तर कापसाचे बोंड खराब  होण्याचा धोका आहे. मराठवाड्याच्या काही भागात कांदा पीक काढून शेतात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस झाला तर पिकाची नासाडी होण्याची भीती आहे. फळबागांनाही ढगाळ वातावरणाचा फटका बसणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा