अस्मानी संकटः राज्यात पुढील तीन-चार दिवस सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

0
298
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः पोषक वातावरणामुळे पुढील तीन-चार दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून आज दुपारपर्यंत राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान खात्याने आज पहाटे सहा वाजता टिपलेल्या उपग्रह छायाचित्रानुसार दक्षिण गुजरातबरोबरच उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावर दाट ढगांची चादर दिसून येत आहे. त्यामुळे आज दुपारी १२ वाजेपर्यंत राज्याच्या अनेक भागात मध्यम स्वरुपाचा ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

आवश्य वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 दुसरीकडे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र काल तीव्र झाले आहे. येत्या २४ तासांत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ते आतल्या दिशेने सरकरण्याची शक्यता असल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पुढील तीन-चार दिवस जोरदार वारे वाहतील आणि राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

या पोषक वातावरणामुळे कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पहायला मिळेल. मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. सोमवार, मंगळवारी पालघर, ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रायगड, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात सोमवार, मंगळवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. आज नांदेड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाची तीव्रता थोडी अधिक असू शकते. विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 राज्याला गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता हवामान विभागाने आणखी तीन-चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे ही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा