पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवात शरद पवारांचा ‘अदृश्य हात’!

0
298
छायाचित्रःtwitter/@Awhadspeaks

नवी दिल्लीः सर्व शक्ती पणाला लावूनही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालवर एकहाती ताबा मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अप्रत्यक्ष मदत केल्यामुळेच मतविभागणी टळली आणि भाजपचा पराभव झाला, अशी कारण मीमांसा आता भाजपचेही नेते करू लागले असतानाच पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता, असा दावा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला होता. शरद पवार हे ममता बॅनर्जींच्या प्रचारासाठीही पश्चिम बंगालला जाणार होते. परंतु त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला होता. या निवडणूक निकालाचे कल आल्यानंतर शरद पवारांनी ममता बॅनर्जींचे लगोलग अभिनंदन केले होते. त्यानंतर निकालानंतरच्या गोंधळावर पवारांनी पश्चिम बंगालमध्ये जे काही सुरू आहे, तो रडीचा डाव असल्याची टीका केली होती. आता या सर्व घडामोडींवर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे.

पश्चिम बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांचा गौप्यस्फोट..! ‘शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.’ याचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात प. बंगालच्या निवडणुकीत होता..!,  असे आव्हाड यांनी म्हटले होते.

काय म्हणाले विजयवर्गीय?: भाजप नेते आणि पश्चिम बंगालचे भाजप निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी मतदानाच्या पहिल्या चार फेऱ्यांमध्ये भाजपने मिळवलेली लीड कापण्यासाठी काँग्रेस आणि माकप हे दोन्ही पक्ष तृणमूल काँग्रेसला शरण गेले. मध्यमवर्गीयांनी कमी मतदान केले. त्यामुळे भाजपचा पराभव झाल्याचे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. तुम्ही जर पाहिले असेल तर मतदानाच्या पहिल्या चार फेऱ्यांमध्ये आम्ही आघाडीवर होतो, परंतु त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये मागे फेकले गेलो. भाजपला रोखण्यासाठी माकप आणि काँग्रेस तृणमूल काँग्रेसला शरण गेले. विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन करणारे पत्र ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांना लिहिल्यानंतर काँग्रेस आणि माकप तृणमूल काँग्रेसला शरण गेले, असे विजयवर्गीय म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा