अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये काय म्हटलंय?, वाचा तपशील

0
1532
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोप प्रकरणात सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आज शनिवारी एफआयआर नोंदवला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या प्राथमिक चौकशीतील निष्कर्षांच्या आधारे हा एफआयआर नोंदवण्यात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. सीबीआयचे पोलिस उपअधीक्षक आर. एस. गुंजीयाल यांनी २१ एप्रिल २०२१ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

सीबीआयने देशमुख आणि अन्य अज्ञात व्यक्तींच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १२ब (गुन्हेगारी कट) आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ (कार्यालयीन कामकाज करताना लोकसेवकाने कायदेशीर मानधनाव्यतिरिक्त बेकायदेशी संतुष्टी मिळवणे) गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर सीबीआयचा गुन्हा: नागपुरातील निवासस्थानी ११ तास झडती सत्र

२०२०- २१ दरम्यान, आपल्या सार्वजनिक कर्तव्याचा अनुचित आणि अप्रामाणिकपणे अनुचित लाभ घेण्याचा प्रयत्न अनिल देशमुख आणि अन्य अज्ञातांनी केला असल्याचे सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. प्राथमिक चौकशीच्या आधारे हा एफआयआर नोंदवण्यात आल्याचेही या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत काय आढळले?

  • महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्य अज्ञातांनी दखलपात्र गुन्हा केल्याचे प्राथमिक चौकशीत सकृत दर्शनी दिसून आले आहे. अनिल देशमुख आणि इतरांनी आपल्या सार्वजनिक कर्तव्याचा अनुचित आणि अप्रामाणिकपणे अनुचित लाभ घेण्याचा प्रयत्न अनिल देशमुख आणि अन्य अज्ञातांनी केला आहे, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
  • सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे हे १५ वर्षांहून अधिक काळ पोलिस सेवेबाहेर राहूनही त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यात आले आहे. सचिन वाझे यांच्यावर मुंबई पोलिसांच्या संवेदनशील आणि महत्वाच्या केसेसची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना ही वस्तुस्थिती माहीत होती, असे प्राथमिक चौकशीत आढळून आल्याचे सीबीआयने फिर्यादीत नमूद केले आहे.

परमबीर सिंगांच्या आरोपांवरच सीबीआयचा पूर्ण विश्वासः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जे मुद्दे मांडले होते. त्यावरच सीबीआय विसंबून असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. परमबीर सिंग यांनी याचिकेत देशमुख यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगवर अनुचित प्रभाव टाकला आणि अधिकाऱ्यांच्या कर्तव्य निर्वहनात हस्तक्षेप केला असा आरोप केला होता. देशमुखांविरोधात प्राथमिक चौकशी पूर्ण करताना आणि एफआयआर नोंदवतानाही सीबीआय परमबीर सिंगांच्या याचिकेतील मुद्यांवरच पूर्णतः विश्वास ठेवल्याचेही गुंजियाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्पष्ट झाले आहे. प्राथमिक चौकशीत अहवालातही सीबीआयने तसे नमूद केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा