सोडून गेलेल्या एकालाही पुन्हा आमदार म्हणून निवडून न येऊ देण्याची नेमकी ‘पवारनिती’ काय?

0
823

‘आता तुमचे तुम्ही बघून घ्या, असे सांगून मी घराबाहेर पडलो आहे’, असे पवारांनी सांगून टाकले आहे. पवार इरेला पेटले आहेत, हे यातून स्पष्ट दिसते. सहसा शरद पवार आक्रमकपणे बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्यात खोच असते, पण असे उघड इशारे किंवा दम देण्याची भाषा यापूर्वी कधी पहायला, ऐकायला मिळाली नाही. ती आता मिळते आहे.त्यामुळे त्याकडे गांभीर्यानेच पहावे लागेल.

समीर सिर्जोनकर / परभणी

अनेक दिग्गज नेते सोडून भाजप किंवा शिवसेनेत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाच्या ‘बांध’बंदिस्तीसाठी पुन्हा ‘तरूणतुर्क’ होऊन मैदानात उतरले आहेत. राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे घेऊन त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रत्येक सभेतील भाषणात पक्ष सोडून गेलेल्यांविषयीचा तीव्र संताप व्यक्त होताना तर दिसतोच, परंतु त्यांची ‘व्यवस्था’ केल्याचा दमही ते देत आहेत. परभणीतील गुरूवारच्या सभेतही पवारांनी अशाच काहीशा भाषेत दम भरला. तरूण कार्यकर्त्यांनी ज्यांना रक्ताचे पाणी करून निवडून आणले, तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून निघून गेले आहेत. जे सोडून गेले आहेत, त्यातील एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अशी व्यवस्था आपण केली आहे, पवार म्हणाले. यापूर्वी त्यांनी ‘आता तुमचे तुम्ही बघून घ्या, असे सांगून मी घराबाहेर पडलो आहे’, असे सांगून टाकले होते. सहसा शरद पवार आक्रमकपणे बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्यात खोच असते, पण असे उघड इशारे किंवा दम देण्याची भाषा यापूर्वी कधी पहायला, ऐकायला मिळाली नाही. ती आता मिळते आहे. मेगा पक्षांतरामुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस क्षीण, गलितगात्र झाली आहे, असा सूर सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यांतून ध्वनित होत आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता असेल, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य त्याचेच द्योतक. त्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही स्पर्धक किंवा विरोधक मानतच नाही, आमचा खरा स्पर्धक-विरोधक भाजपच आहे, हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य त्यात भर घालणारे! या पार्श्वभूमीवर स्वतःच मैदानात उतरले आहेत.


‘सोडून गेलेल्यांना पुन्हा निवडून न येऊ देण्याची व्यवस्था’ केली म्हणजे पवारांनी नेमके काय केले? पवारांच्या या अशा सांगण्यात जे पक्षात आहेत, त्यांनी तरी यापुढे सोडून जाण्याचा विचार मनात आणू नये, सोडून गेलो तर आपली धडगत नाही, अशी धास्ती भरवण्याचा हेतू आहे, हे स्पष्ट आहे. पण जे सोडून गेले त्यांच्या भविष्यकालीन राजकारणाला पवार बासनात गुंडाळून ठेऊ शकतील काय? हा खरा प्रश्न आहे.

पक्षाला नव्याने उभारी देऊ शकेल किंवा ज्यांच्या शब्दांवर नेते, कार्यकर्ते- पदाधिकारी विश्वास ठेवू शकतील, असा दुसरा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे पवारांना हे शिवधनुष्य स्वतःच खांद्यावर घ्यावे लागले आहे. कधी नव्हे इतक्या आक्रमकपणे ते बोलू लागले आहेत. ज्या आमदार, नेत्यांनी पक्ष सोडला आहे, त्यातील एकही नेता यापुढे निवडणुकांमध्ये निवडून येणारच नाही, अशी व्यवस्था आपण केली आहे, असे सांगतानाच भाजपकडे संपत्तीचा डोंगर असेल, पण आमच्याकडे तरूणांचा सागर आहे. या सागराच्या जोरावरच आम्ही परत सत्ता स्थापन करून, असा दावा शरद पवार करत आहेत. सरकार कुणाचेही येवो, सत्ता आपलीच येणार, असेही पवार सांगतात.

‘सोडून गेलेल्यांना पुन्हा निवडून न येऊ देण्याची व्यवस्था’ केली म्हणजे पवारांनी नेमके काय केले? तरूणांच्या सागराच्या जोरावर हे करून दाखवू असे पवार म्हणतात, त्यात कितपत तथ्यांश आहे? पवारांच्या या अशा सांगण्यात जे पक्षात आहेत, त्यांनी तरी यापुढे सोडून जाण्याचा विचार मनात आणू नये, सोडून गेलो तर आपली धडगत नाही, अशी धास्ती भरवण्याचा हेतू आहे, हे स्पष्ट आहे. पण जे सोडून गेले त्यांच्या भविष्यकालीन राजकारणाला शरद पवार बासनात गुंडाळून ठेऊ शकतील काय? हा खरा प्रश्न आहे. राजकारणात एखाद्याची घडी घालून त्याला वळचणीत टाकण्याचे शरद पवारांचे राजकीय उपद्रव मूल्य वादातीत आहे. त्यांच्या या उपद्रव मूल्याचा अनुभव दस्तूरखुद्द स्वर्गीय विलासराव देशमुखांनाही आलेला होता. राज्यातील गावागावात अजूनही पवारांचा जनसंपर्क आहे. प्रत्येक गावातील किमान पाच माणसांना तरी शरद पवार अजूनही नावानिशी ओळखतात, असे सांगितले जाते. हेच त्यांच्या आजवरच्या राजकीय यशाचे गमक आहे. पण त्याहीपेक्षा राजकारणात शरद पवारांची अशी एक स्वतंत्र ‘पवारनिती’ आहे. अनेकदा त्यांच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष व्यूहरचनेत जमीन अस्मानचे अंतर असते. पवारांकडे स्वतःचे असे काही राखीव पत्तेही असतात. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला तग धरून ठेवायचे असेल तर आता हे राखीव पत्ते काढल्याशिवाय गत्यंतर नाही, हे पवारांच्याही लक्षात आलेलेच आहे. त्यामुळे एखाद्या नेत्यांच्या बाबतीत पवारांनी ठरवले तर ते त्याला हमखास पाडू शकतात. त्यांच्या या व्यूहरचनेत साताऱ्याचे उदयनराजे भोसले नक्की असतील, पण उस्मानाबादचे डॉ. पद्मसिंह पाटील किंवा राणा जगजितसिंह पाटील असतील की नाही? हे आताच सांगता येणार नाही. पण एक मात्र नक्की पवारांची ही भाषा त्यांना ओळखून असलेल्यांच्या उरात धडकी भरवणारी नक्कीच आहे. त्यांनी केलेली ‘व्यवस्था’ कितपत फलदायी ठरते, हे विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावरच कळेल आणि सरकार कुणाचेही येवो, सत्ता आपलीच येणार, या पवारांच्या विधानाचा नेमका अर्थ काय, याचाही उलगला होऊन जाईल. पण यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात चांगलीच रंगत- चुरस भरणार, हे मात्र स्पष्ट आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा