१५ मेनंतरही व्हॉट्सऍप अकाऊंट सुरू राहणार, प्रायव्हेसी पॉलिसी अपडेट करण्याची डेडलाइन रद्द

1
64

नवी दिल्लीः प्रायव्हेसी पॉलिसी म्हणजेच गोपनीयतेचे वादग्रस्त धोरण न स्वीकारलेल्या वापककर्त्यांचे व्हॉट्सऍप अकाऊंट १५ मेनंतर बंद होणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. कारण व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना गोपनीयतेचे धोरण अपडेट करण्यासाठी १५ मेची मुदत दिली होती. मात्र वादात सापडलेले हे गोपनीयतेचे धोरण न स्वीकारलेल्या वापरकर्त्यांसाठी आता व्हॉट्सअॅपने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यांनी हे धोरण अद्याप स्वीकारलेले नाही, त्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट १५ मेनंतरही सुरूच राहील, असे व्हॉट्सअॅपने जाहीर केले आहे.

यावर्षीच्या जानेवारी महिन्यात व्हॉट्सअॅपने आपल्या गोपनीयतेच्या धोरणात बदल केल्याची घोषणा केली होती. हे नवीन धोरण लागू करण्यासाठी व्हॉट्सअॅपने आधी ८ फेब्रुवारीची मुदत दिली होती. या मुदतीत वापरकर्त्यांनी गोपनीयतेचे नवीन धोरण अपडेट करणे अपेक्षित होते. मात्र या गोपनीयतेच्या धोरणावरून वाद निर्माण झाला.

अनेक वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपवर डाटा सुरक्षित नाही. व्हॉट्सअॅपचा डाटा फेसबुक, इन्स्टाग्रामवर जाईल, अशी भीती व्यक्त केली होती. त्यामुळे व्हॉट्सअॅपने ही मुदत वाढवून १५ मे केली होती. या मुदतीपर्यंत वापरकर्त्यांनी नवीन गोपनीयतेचे धोरण स्वीकारले नाही तर त्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद केले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेक वापरकर्ते व्हॉट्सअॅप सोडून सिग्नल आणि टेलिग्रामकडे वळले होते.

वापरकर्त्यांची संख्या कमी होण्याचा धोका आणि स्पर्धक लक्षात घेता आता व्हॉट्सअॅपने १५ मेच्या मुदतीनंतरही गोपनीयतेचे धोरण न स्वीकारणाऱ्या वापरकर्त्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद केले जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. आम्ही पुढील काही आठवडे लोकांना धोरण अपडेट करण्याबाबत रिमांइंडर देत राहू. भारतातील बहुतांश वापरकर्त्यांनी नव्या अटी स्वीकारून व्हॉट्सअॅप धोरण अपडेट केले आहे. तर काही लोकांना गोपनीयतेचे धोरण अपडेट करण्याची संधीच मिळाली नव्हती, असे व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा