‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तक वादावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांची आळीमिळी गुपचिळी!

0
462
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन तब्बल पाच वर्षे महाराष्ट्राची निर्विवाद सत्ता उपभोगलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह एकाही भाजप नेत्याने महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदींची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या वादावर आळीमिळी गुपचिळीचे धोरण अवलंबले आहे. प्रत्येक घटनाघडामोडींवर विशेषतः महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारच्या प्रत्येक निर्णयावर ट्विटरच्या माध्यमातून तुटून पडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनीही याबाबत अद्याप चकार शब्दही काढला नसल्यामुळे नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांशी केलेली तुलना त्यांना मान्य आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात ‘छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ’ अशी साद घालत मते मागितली आणि महाराष्ट्राची सत्ता हस्तगत केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही ‘छत्रपतींचा आशीर्वाद पुन्हा भाजप सरकार’ अशी जाहिरातबाजी करत महाराष्ट्राची मते आपल्या झोळीत पाडून घेतली. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अग्रभागी होते. परंतु तेच फडणवीस ‘ आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक आणि सत्तेसाठी ज्यांचा आशीर्वाद घेतला त्या छत्रपती शिवरायांशी नरेंद्र मोदींची तुलना केल्याच्या प्रकारावर चकार शब्दही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या या मौनाबद्दल संशय घेतला जात असून त्यांना नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांशी केलेली तुलना मान्य आहे का? असा सवालही केला जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मान्य आहे का?  असा सवाल करत असल्यास त्यांनी तसे स्पष्ट सांगावे, असे आव्हान दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. मात्र भाजप कार्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात मोदींची थेट शिवरायांशी तुलना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना हे मान्य आहे का? असा सवाल करत असा सवाल करत सर्व मुद्यांवर लगेच भूमिका मांडणारे भाजप नेते शिवराय आणि मोदींच्या तुलनेवर आज सायंकाळपर्यंत भूमिका स्वतःची भूमिका मांडतील, अशी अपेक्षा पत्रकार परिषदेत व्यक्त केली. छत्रपती शिवरायांचे सगळे वंशज भाजपमध्ये आहेत. त्यांनी तत्काळ राजीनामे द्यावेत, असेही खासदार राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा