महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज का? ही आहेत कारणे…..

0
93
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेले महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालत नसल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस घटक पक्षांवर नाराज का? अशी चर्चा सुरू झाली असून तीन पक्षाच्या सरकारमध्ये काँग्रेसला फारसे महत्व मिळत नसल्याची खंत हेच काँग्रेसच्या नाराजीचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा हे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालेल असेल सांगण्यात आले होते. मात्र तसे होत नसून किमान समान कार्यक्रमावर काम व्हायला व्हावे, अशी अपेक्षा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. सोनिया गांधींचे हे पत्र पुढे आल्यानंतर भाजपला महाविकास आघाडीवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आणि भाजप नेते काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडण्याचे सल्ले देऊनही मोकळे झाले आहेत. परंतु तसे काहीही होणार नसून किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करणे ही काही फाटाफुटीची चिन्हे समजू नये, असे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले.

मुस्लिम आरक्षणाचा प्रलंबित मुद्दा मार्गी लावणे, काँग्रेसकडे असलेल्या मंत्रालयांना निधी न मिळणे आणि कोरोना काळात आलेल्या वाढीव वीज बिलात सूट देण्यासाठी निधी न उपलब्ध करणे ही काँग्रेसच्या नाराजीची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुर्लक्ष केले जात असल्याची भावना काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये आहे. निधीचे समान वाटप होत नसल्याचीही अनेक काँग्रेस आमदारांची तक्रार आहे.

किमान समान कार्यक्रम हाच संवादाचा मूळआधार- काँग्रेसः महाविकास आघाडीचा मूळआधार हा किमान समान कार्यक्रम आहे. एकमेकांशी संवाद साधायचा आहे, तो हाच आधार आहे. सोनिया गांधी यांना पक्षाकडून जे काही इनपूट आले आहेत, त्यावरून महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे या पत्राला राजकीय वळण देऊ नये, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. भाजप हाच महाराष्ट्र द्रोही पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा भाजपनेच आत्मपरीक्षण करावे, अन्यथा जनता त्यांना थारा देणार नाही, असेही सावंत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा