देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्रावर एवढा राग का आहे? हेच समजत नाहीः अनिल देशमुख

0
349
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण चांगलेच पेटले असून अन्वय नाईक प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांचे तोंड काळे झाले, असे म्हणणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावर एवढा राग का आहे? हेच समजत नाही, असे म्हणत देशमुख यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावर इतका राग का आहे, हेच समजत नाही. यासंदर्भातील राजकारणात मी जाऊ इच्छित नाही. परंतु त्यांचे आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्याचे नव्हे तर पोलीसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

 स्वत: फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने पोलीस दलाचे नेतृत्व केले आहे. पाच वर्षे याच पोलीसांनी त्यांना प्रशासन चालवण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात साथ दिली.त्यांचेच ‘थोबाड काळे झाले’ या प्रकारची भाषा हे वापरू कशी शकतात?, असा सवाल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. आपल्या समाजाचे म्हणून काही आदर्श आहेत. सामान्य माणसाचा कायदा व सुव्यवस्थेवरचा विश्वास त्यामुळे टिकून आहे.क्षुद्र राजकारणासाठी आपण या पध्दतीचे आरोप करून सामान्य जनतेचा हा विश्वास डळमळीत करू नका असे मी फडणवीसांना आवाहन करतो, असे देशमुख म्हणाले.

अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मुंबई पोलिसांचे अक्षरश: थोबाड काळे झाले आहे. ज्यांनी तपास केला त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहेत. ते मला असे वाटते गृहमंत्री विसरले आहेत. मुंबई पोलिसांपेक्षाही गृहमंत्री यांनी हा तपास पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना तो करारा जबाब आहे. पण मी तरी देखील त्यांना खुले आव्हान दिले आहे. अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी जरूर माझी चौकशी करावी, असे फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा