फसवाफसवीचे कोण कोण भागीदार?: प्रा. तोटावाड यांना उच्च शिक्षण सहसंचालक, विद्यापीठाचे अभय?

0
181
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः एसटी प्रवर्गातून इंग्रजी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन ओबीसी प्रवर्गातून प्राध्यापकाची नोकरी मिळवलेले प्रा. नागनाथ तोटावाड यांच्या फसवाफसवीचा पर्दाफाश होऊनही औरंगाबादचे उच्च शिक्षण सहसंचालक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला का कचरत आहे? प्रा. नागनाथ तोटावाड यांच्या फसवाफसवीला त्यांच्याकडून अभय का दिले जात आहे? की या फसवाफसवीत प्रा. नागनाथ तोटावाड यांच्या इतकेच तेही भागीदार आहेत?, असे प्रश्न आता निर्माण होऊ लागले आहेत.

 प्रा. डॉ. नागनाथ रामराव तोटावाड हे औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २००५ पासून म्हणजेच गेल्या १६ वर्षांहून अधिक काळ इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या महाविद्यालयात प्रा. डॉ. तोटावाड यांची नियुक्ती ओबीसीसाठी आरक्षित जागेवर झाली आहे. परंतु त्यांनी २९ सप्टेंबर २००३ मध्ये एसटी प्रवर्गातून इंग्रजी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासंबंधीचा डेटा पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरील सेट परीक्षेच्या सेक्शनमध्ये उपलब्धही आहे.

हेही वाचाः पुणे विद्यापीठानेही उघड केली प्रा. तोटावाड यांची बनवाबनवी, एसटीचे जातप्रमाणपत्र आणले समोर

एसटी प्रवर्गातून सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सहायक प्राध्यापकाच्या जागेवर नियुक्ती देण्यात आलीच कशी? प्रा. तोटावाड यांची नियुक्ती करताना निवड समितीने मूळ कागदपत्रांची छानणी केली नाही का? की डोळे बंद करून प्रा. तोटावाड यांना नियुक्ती देण्यात आली?  विदयापीठ प्रशासनानेही प्रा. तोटावाड यांच्या नियुक्तीला मान्यता देताना, त्यांना वेळोवेळी पदोन्नती आणि वेतनश्रेणी निश्चित करताना मूळ कागदपत्रांकडे कानाडोळा का केला? असे प्रश्न उपस्थित होत असतानाच या फसवाफसवीबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि उच्च शिक्षण सहसंचालकाकडे पुराव्यानिशी लेखी तक्रार करण्यात आली.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

आम्ही फारच तत्परतेने आणि प्रामाणिकपणे कारवाई करत आहोत, अशा अविर्भावात विद्यापीठ प्रशासनाने २९ नोव्हेंबर रोजी तीन दिवसांत आणि ३० नोव्हेंबर रोजी उच्च शिक्षण सहसंचालकांनी दोन दिवसांत तातडीने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिले. आता त्या घटनेला आठवडा उलटून गेला तरी विवेकानंद महाविद्यालयाने या दोन्ही प्रशासनाच्या तातडीच्या निर्देशांचे पालन करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला की नाही? आणि केला असेल तर विद्यापीठ प्रशासन आणि उच्च शिक्षण सहसंचालकांनी त्या अहवालावर काय कारवाई केली? हे सारेच गुलदस्त्यात आहे.

हे सर्व सुरू असतानाच पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाच्या सहायक कुलसचिवांनी  विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यापीठाच्या कुलसचिवांना २ डिसेंबर रोजी पत्र लिहून प्रा. नागनाथ तोटावाड यांच्या नियुक्तीबाबत करण्यात आलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असल्याचे मत नोंदवत प्रा. तोटावाड यांच्या सेट परीक्षा उत्तीर्णतेचा तपशील आणि सोबतच त्यांनी सेट परीक्षेचा अर्ज भरताना दाखल केलेले एसटी जातीचे प्रमाणपत्रच पाठवून दिले. तरीही विद्यापीठ आणि उच्च शिक्षण सहसंचालक गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेली ही धुळफेक आणि फसवाफसवीला अभय का देत आहेत?, प्रा. नागनाथ तोटावाड यांच्या दोन विविध प्रवर्गातील जातीबाबतचे भक्कम पुरावे विद्यापीठ प्रशासनाला उपलब्ध होऊनही कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले असून या फसवाफसवीत कोण कोण भागीदार आहेत? याचीची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होऊ लागली आहे.

प्रा. नागनाथ तोटावाड यांच्याबाबतची न्यूजटाऊनकडे असलेली माहिती धक्कादायक असून फसवाफसवीचे हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचेच त्यावरून स्पष्ट होते. या फसवाफसवीत सहभागी चेहरे आणि मोहरेही त्या माहितीतून उघड होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा