तोंड कंगनाचे, पण रसद कुणाची?: महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान भाजपला समर्थनीय का वाटतो?

0
26

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होऊन ‘वर्षा’ बंगला सोडावा लागला. तेव्हा त्या बंगल्याच्या भिंतीवर जी भाषा बोलली गेली होती, त्या भाषेत आणि सध्या कंगना रणौत बोलत असलेल्या भाषेत तसूभरही फरक नाही. भलेही फडणवीसांनी वर्षाच्या भिंतीवर जे लिहिलेले आढळले, ते आपल्या मुलीने लिहिले नाही, असा खुलासा केला होता, पण सध्या ते कंगनाच्या भाषेवर म्हणजेच महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अपमानावर निषेधाचा चकार शब्दही बोलत नसल्यामुळे आपल्या पोटातली भाषा कंगनाकडून ट्विटवर बोलवून तर घेत नाहीत ना? अशीही शंका घेता येऊ शकते.

प्रमिला सुरेश/ मुंबई
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आणि सर्वात प्रागतिक राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एखाद्या सुमार अभिनेत्रीने अरे तुरेची भाषा वापरावी आणि त्याबद्दल पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद उपभोगलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना जरासीही लाज वाटू नये? फडणवीस ज्या भाजपचे नेते आहेत, त्याच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाराष्ट्र सरकार कंगना रणौतच्या मागे लांडग्यासारखे लागल्याचे सांगत प्रचंड आक्रोश करतात, परंतु त्यांनाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल अरे तुरेची भाषा वापरणाऱ्या त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीचा निषेध करण्यासाठी दोन शब्दही उच्चारावे वाटू नयेत? कंगना रणौतच्या तोंडून अश्लाघ्य वक्तव्य करवून घेऊन भाजप राज्याच्या सत्तेपासून वंचित राहिल्याचा बदला तर घेत नाही ना?, हे आणि असे अनेक प्रश्न गेल्या काही दिवसांत कंगना रणौत प्रकरणावर भाजपने घेतलेल्या भूमिकेवरून उपस्थित झाले आहेत.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचा अधिकृत अभिमान बाळगणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना घटनात्मक शपथ दिली आहे. राज्यातील कोट्यवधी लोकांनी मतदान करून ज्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत, त्यांच्याबद्दल एखाद्या टिनपाट हिमाचली अभिनेत्रीने वापरलेली अरे तुरेची भाषा भाजप, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना गुदगुल्या कशी करू शकते? विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करावा, अशी अपेक्षा ठेवणाऱ्या भाजपला कंगना रणौतची भाषा आक्षेपार्ह आणि निषेधार्ह का वाटत नाही? देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचे कंत्राट आपल्याचकडे आहे, अशा अविर्भावात वावरणाऱ्या भाजपकडून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना रणौतचा वाय दर्जाची सुरक्षा पुरवून सन्मान कसा केला जाऊ शकतो?

कंगना रणौत जे ट्विट आणि व्हिडीओ शेअर करते आहे, त्यावरून ही सगळी रसद ‘ट्रोल आर्मी’त नैपुण्य असलेला राजकीय पक्ष पुरवतो आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. एकीकडे कंगना रणौत शिवसेनेला सोनिया सेना म्हणते आणि दुसरीकडे एखाद्या महिलेवर अन्याय होताना पाहून तुम्हाला दुःख होत नाही का? असा सवाल ती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना करते. ती दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एकेकाळच्या भाषणाचा व्हिडीओही शेअर करते. कंगना रणौतकडे राजकीय नेत्यांच्या भाषणांच्या व्हिडीओची एवढी समृद्ध लायब्ररी आली कुठून? ती एक साधी अभिनेत्री. दिग्दर्शकांच्या इशाऱ्यावर अभिनय करणारी संहितालेखकाचे संवाद वाचणारी!  मग तिला हे सगळे दिग्दर्शन कोण करतेय? संहिता कोण पुरवतेय?  बाळासाहेब ठाकरे कोणत्या सभेत काय बोलले होते, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनाही आठवत नसेल तेवढे कंगनाला आठवावे एवढा तिचा राजकीय वकुब आणि ‘संग्रह’ आहे का?

ज्यांच्याकडे असा संग्रह आहे आणि ज्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘ट्रोल आर्मी’ वापरून डॉ. मनमोहनसिंगांचे सरकार बदनाम केले, तोच विशिष्ठ राजकीय पक्ष तिला ही साधनसामुग्री पुरवत आहे. हे स्पष्ट आहे. ज्या कंगना रणौतला मराठीत ‘पाणी’ हा उच्चारही नीट करता येत नाही, ती कंगना अस्खलित मराठी भाषेत ट्विट करते, हाच त्याचा पुरावा!  त्या राजकीय पक्षाच्या मिडीया सेलने साधनसामुग्री पुरवायची आणि कंगनाने तिच्या ट्विटर हँडलवरून ती पोस्ट करायची, एवढेच सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून!

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होऊन ‘वर्षा’ बंगला सोडावा लागला. तेव्हा त्या बंगल्याच्या भिंतीवर जी भाषा बोलली गेली होती, त्या भाषेत आणि सध्या कंगना रणौत बोलत असलेल्या भाषेत तसूभरही फरक नाही. भलेही फडणवीसांनी वर्षाच्या भिंतीवर जे लिहिलेले आढळले, ते आपल्या मुलीने लिहिले नाही, असा खुलासा केला होता, पण सध्या ते कंगनाच्या भाषेवर म्हणजेच महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अपमानावर निषेधाचा चकार शब्दही बोलत नसल्यामुळे आपल्या पोटातली भाषा कंगनाकडून ट्विटवर बोलवून तर घेत नाहीत ना? अशीही शंका घेता येऊ शकते.

 हे असे का होतेय? त्याचे कारणही आहे. हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असे सांगत भाजपकडून कधी सप्टेंबरची तर कधी ऑक्टोबरची डेडलाइन दिली जात आहे. मुंबईत परराज्यातून आलेल्या मतदारांची संख्या जास्त आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका स्वबळावर भाजपला आपल्या ताब्यात घ्यायची आहे. ‘बजाओ पुंगी, हटाओ लुंगी’ असे जाहीर आंदोलन करून मराठी अस्मितेचा एल्गार करणाऱ्या शिवसेनेला मुंबईत नामोहरम करायचे तर कंगनासारखा ‘परराज्यीय’ हिमाचली चेहरा भाजपला हवाच होता.

कंगनाच्या आडून भाजपला मुंबईतील ‘बाहेर’च्या मतदारांमध्ये आपले स्थान बळकट करून त्यांची मते आपल्याकडे खेचायची आहेत. हे परराज्यातील मतदार काँग्रेसला मानतात आणि ती काँग्रेस सध्या शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळेच कंगनाच्या तोंडून शिवसेनेला सोनिया सेना म्हणून भाजपने काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाने राजकारण जरूर करावे. तो त्यांचा लोकशाही अधिकार, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा कोणत्या पक्षाचा नाही, तो महाराष्ट्राचा आहे, म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्या अस्मितेचाच अपमान फडणवीसांच्या भाजपला बृहन्मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी समर्थनीय कसा वाटतो?

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा