परळीत आलेल्या करूणा शर्माच्या गाडीत पिस्टल आले कुठून?, हेतू काय?, सगळेच चक्रावले

0
414
संग्रहित छायाचित्र.

बीडः परळीत येऊन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या कुटुंबावर केलेल्या कथित अत्याचाराचा पर्दाफाश करण्याची घोषणा करणाऱ्या मुंबईच्या करूणा शर्मा यांच्या इनोव्हा गाडीत पोलिसांना पिस्टल आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून पत्रकार परिषदेसाठी आलेल्या करूणा शर्मा यांच्या गाडीत हे पिस्टल आलेच कुठून? या प्रश्नाने सगळेच चक्रावून गेले आहेत.

करूणा शर्मा यांनी गुरूवारी फेसबुक लाइव्ह करून आपण परळीत येऊन आपल्यावरील अत्याचाराचा पर्दाफाश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून बीडमधील जनतेचा आशीर्वाद आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून समस्या जाणून घेणार असल्याचे आणि अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी करून गावकऱ्यांशी संवादही साधणार असल्याचे म्हटले होते. रविवारी दुपारी १२ वाजता परळी वैजनाथमधील लोकांसमोर काही गोष्टींचा खुलासाही करणार आहे, असेही करूणा शर्मा यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. करूणा शर्मा या  काही राजकीय नेत्या किंवा सामाजिक कार्यकर्त्याही नाहीत. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या ठिकाणांची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेणार असल्याचे त्यांचे म्हणणे अनेकांच्या मनात शंका निर्माण करणारे ठरले आहे. त्यांचा बोलवता धनी कोण? अशी चर्चाही सुरू झाली होती.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

ही चर्चा सुरू असतानाच आज करूणा शर्मा परळीत दाखल झाल्या. त्या परळी वैजनाथ मंदिरात आल्या असताना रेटारेटी झाली. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून करूणा शर्मा यांना पोलिस ठाण्यात नेऊन बसवले. करूणा शर्मा यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आल्यानंतर ज्या इनोव्हा गाडीतून प्रवास करत त्या परळीत दाखल झाल्या, त्या गाडीची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता पोलिसांना एक पिस्टल आढळून आले आहे.

करूणा शर्मा यांना परळीत येऊन पत्रकार परिषद घ्यायची होती आणि आपल्यावरील कथित अत्याचाराचा खुलासाच करायचा होता, तर त्यांनी गाडीत पिस्टल का आणले?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. करूणा शर्मा या सध्या परळी शहर पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. गाडीत पिस्टल ठेवण्याचा त्यांचा नेमका हेतू काय होता? याचीही तपासणी केली जात आहे. आता पोलिस या प्रकरणी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचाः परळीत राडाः करूणा शर्मा यांच्या गाडीत पिस्टल आढळले, पोलिसांकडून चौकशी सुरू

 करूणा शर्मा या परळीत दाखल झाल्यानंतरच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी परळीत येऊन वैजनाथाच्या पायरीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कार्यकर्त्यांनी विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. साहेबांना बदनाम करण्यासाठी आलीस का? म्हणत त्यांना विरोध केला. परिस्थिती चिघळण्याआधीच खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यांना शहर पोलिस ठाण्यात नेले. तेथे नेल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीची झाडाझडती घेतली असता पिस्टल आढळले आणि या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. परळीत अजूनही तणाव आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा