सत्ता तिथे सत्तारः अब्दुल सत्तारांची काँग्रेसमध्ये चाललेली लुडबुड शिवसेनाही खपवून घेणार का?

0
269
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादःलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजपमध्ये जाण्यास इच्छूक असलेले परंतु स्थानिक नेत्यांच्या प्रखर विरोधामुळे नाईलाजाने शिवसेनेत गेलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमध्ये असताना केलेली लुडबुड आणि चालवलेला एककल्लीपणा शिवसेनाही खपवून घेणार का?, असा प्रश्‍न आता निष्ठावंत शिवसैनिकांना पडला आहे.‘सत्ता तिथे सत्तार’ अशीच औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात ओळख असलेल्या अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर सत्तार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने अडीच वर्षांसाठी काँग्रेसला अध्यक्षपद देऊ केलेले असताना महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र मातोश्रीच्या आदेशाविरुद्ध जाऊन भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. शिवसेनेत येऊन अवघे काही महिनेच झालेल्या अब्दुल सत्तारांचे सिल्लोड तालुक्यातील राजकारण एककल्ली आणि एकहुकमीपणाचे आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सत्तारांना पर्याय ठरू शकेल असा नेताच नसल्यामुळे काँग्रेसमध्ये असताना त्यांचे हे राजकारण चालले आणि काँग्रेस नेत्यांनी खपवूनही घेतले. शिवसेनेत आल्यानंतरही अब्दुल सत्तार तोच कित्ता गिरवू पहात आहेत. परंतु औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेकडे आक्रमक नेत्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांची डाळ शिजत नाही, असे लक्षात येताच त्यांनी दबावतंत्राचा भाग म्हणून राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची पुडी सोडली. अब्दुल सत्तारांनी पक्षादेश म्हणून मातोश्रीच्या आदेशाचे पालन केले असते तर त्यांच्या पक्षनिष्ठेवर शिक्कामोर्तब झाले असते. परंतु काँग्रेसचा अध्यक्ष होऊ द्यायचाच नाही, एवढ्याच राजकीयद्वेषातून त्यांनी मातोश्रीचा आदेश डावलून भाजपशी जवळीक साधल्याने या पुढील काळात शिवसेनेत त्यांचे स्थान नेमके काय असेल, याबाबतही अनेकांना आता शंका वाटू लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा