आजपासून हिवाळी अधिवेशनः अविश्वास ठराव मांडूनच दाखवा- अजित पवारांचे भाजपला आव्हान

0
61

मुंबई:  महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरूवात होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला खुले आव्हान दिले. भाजपला जर महाविकास आघाडी सरकारबद्दल अविश्वास वाटत असेल तर त्यांनी सभागृहात तसा ठराव मांडावा. राज्य सरकार आपले मताधिक्य सिद्ध करेल, असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला दिले.

सह्याद्री अतिथीगृहावर मंगळवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापाननंतर मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. पत्रकारपरिषदेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे एकही कारण शिल्लक ठेवले नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर अजित पवार यांनी हे आव्हान दिले. पाटील यांना आरोप करण्यापलीकडे दुसरे काही सूचत नाही. आता राष्ट्रपती राजवट कधी लागू होईल तेवढे प्रयत्न चालले आहेत. सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा असताना केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असे विधान करत असतील तर धन्यच म्हणावे लागेल. भाजपला जर अविश्वास वाटतच असेल तर त्यांनी सभागृहात तसा ठराव मांडावा, राज्य सरकार आपले मताधिक्य सिद्ध करेल, असे आव्हानच पवार यांनी भाजपला देऊन टाकले.

या अधिवेशनात जवळपास २६ विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये  पाच प्रलंबित विधेयके, प्रस्तावित मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त प्रस्तावित २१ विधेयके अशी एकूण २६ विधेयके व अध्यादेश या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जाणार आहे.

ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन कामकाजाचा कालावधी कमी निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान शुक्रवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन पुढील कामकाज कालावधीबाबत निर्णय घेण्यात येईल. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडही करण्यात येणार आहे. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. 

शेतकरी विधेयके मागे घेणारः या अधिवेशनामध्ये महत्वाचे शक्ती फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक मांडण्यात येणार आहे. केंद्र सरकारने शेतकरी संबंधित तीन कायदे मागे घेतल्याने शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२१ , शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (प्रचालन व सुलभीकरण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२१, अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२१ ही विधेयके मागे घेण्यात येणार आहेत.

आरक्षण हक्कांचे संरक्षण हीच भूमिकाः ओबीसी, एससी, एसटी आरक्षण हे संविधानाने दिलेले आहे. त्या हक्कांचे रक्षण केलेच पाहिजे हीच शासनाची भूमिका आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सर्व ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती. या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, असेही पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठणठणीतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली असून मुख्यमंत्री अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक आठवड्याला मंत्रिमंडळ बैठक होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन आढावा बैठका होत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांनी रूजू व्हावेः एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करुन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ आणि पगारातही वाढ देण्यात आली आहे. एसटी संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेवेत रुजू व्हावे. टोकाचा निर्णय घेण्याची वेळ कर्मचाऱ्यांनी आणू नये. शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

सर्व मुद्यांवर उत्तरे देण्यास तयारः देशातील इतर राज्यांशी तुलना करता राज्यात मद्यावरील कर ३०० टक्के होता. तो कमी केला आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले. सरकार अधिवेशनात उपस्थित होणाऱ्या सर्व मुद्द्यांवर चर्चा आणि उत्तरे देण्यास तयार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून चहापानाला सर्वांना बोलावले होते, असेही पवार यांनी सांगितले.

कुलगुरू निवड राज्यपालांकडूनचः विद्यापीठांचे कुलगुरू नेमण्यात राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा प्रश्नच नसून याबाबत समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीकडून राज्य शासनाला पाच नावे सुचविण्यात येणार असून त्यापैकी दोन नावे निश्चित करून राज्यपालांकडे पाठविली जाणार आहेत. त्यातून राज्यपालांकडूनच कुलगुरुंची नियुक्ती होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

परीक्षा घोट्याळ्याची निष्पक्ष चौकशीः गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षासंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्यात येत असून याबाबतचा तपास सुरु आहे. कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. या सर्व प्रकरणाबाबत पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा