उद्यापासून विधिमंडळ अधिवेशनः प्रवेशासाठी लसीचे दोन्ही डोस, आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

0
45
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या २२ डिसेंबरपासून मुंबईच्या विधान भवनात सुरू होत असून अधिवेशन काळात विधान भवनात प्रवेशासाठी लसीचे दोन्ही डोस आणि आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या २,६७८ जणांच्या आरटीपीसीआर चाचणीपैकी ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरटी-पीसीआर चाचणी, सुरक्षा, कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह या उपाययोजनांसंदर्भात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.

ओमीक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना नाईक-निंबाळकर यांनी दिल्या. सोमवारी एकूण २,६७८ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली, त्यापैकी ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. लसीचे दोन्ही डोस आणि त्याचबरोबर आरटी-पीसीआर चाचणी विधान भवन प्रवेशासाठी बंधनकारक आहे.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

अधिवेशन कालावधीत गर्दी होऊन संसर्ग वाढू नये यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नसून स्वीय सहायकांसाठी बसण्याची व्यवस्था विधान भवनासमोरील वाहनतळ आवारात स्वतंत्र मंडप टाकून करण्यात आली आहे. मंत्री यांच्या आस्थानपनेवरील कर्मचारी यांनाही अत्यंत मर्यादित संख्येने प्रवेश देण्यात येत आहे.

विधानसभा सभागृहामध्ये सुयोग्य अंतर राखण्याच्या दृष्टीने अधिवेशन कालावधीमध्ये सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था एक आसन सोडून करण्यात आली आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच सभागृहाच्या गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

विधानपरिषद सभागृहामध्ये आसन व्यवस्था पुरेशी असल्यामुळे सन्माननीय सदस्यांची बसण्याची व्यवस्था सभागृहामध्येच करण्यात आली आहे. विधानसभा, विधानपरिषद व मध्यवर्ती सभागृहामध्ये निगेटिव्ह प्रेशर यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सह सचिव (समिती) डॉ. अनिल महाजन, उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव रविंद्र जगदाळे, पोलीस दल, वैद्यकीय विभाग, अग्निशमन यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा